2 MODERN ART -THOUGHT -FEATURES AND COMMENTARY -2नव -आधुनिक कला -विचार,वैशिष्टे व भाष्य
नव -आधुनिक कला -विचार वभाष्य
या आधी ब्लॉगवरील नव -आधुनिक कला -विचार,वैशिष्टे विस्तार या लेखातील या विषयाचा विस्ताराने आढावा घेणाऱ्या
“नवभारत “जानेवारी २०१७
अंकात
चित्र शिल्प या वरील “रुपबंध “ या श्री.एस.डी.इनामदार यांच्या पुस्तकावरील माझा परिचय वजा परीक्षण लेख प्रसिद्ध झाला त्याचा कांही संक्षिप्त आणि पुन:श्च संपादित भाग मी येथे देत आहे.
श्री. इनामदार यांचा मूळ पिंड साहित्यिकाचा असल्याने चित्र –शिल्प कलेतील, नव नव प्रवाह ,प्रयोग आणि रूढ –परंपरागत संकल्पनाना आव्हान आणि छेद देत अस्तित्वात आलेले पूर्व आणि उत्तर दृकप्रतयवाद , घनवाद , दादावाद , अतिवास्तवता वाद इं. चा इतर कला प्रकारात शोध घेत घेत भाषेच्याच्या मर्यादे पर्यंत येत ते आधुनिक कला –मॉडर्न आर्ट चा विचार -विस्तार मांडतात. त्यांच्या नव्या “रूपबंध “ कला समीक्षा या ग्रंथात जास्तीत जास्त विश्वसनिय माहिती कमीत कमीत ओळीत देण्याची विश्वकोशीय लिखाणाची शिस्त पाळतानाच त्यानी रूक्षता टाळून त्याला रसगृहणात्मक साज देत विस्तृत विवेचन केले आहे.
विषयाचा आवाका,ऐत्यहासिक कालखंड (इ.स.१४००ते२०००) आणि त्यास अनुसरून त्या त्या काळात कलेच्या क्षेत्रात उफ़ाळून आलेले विविध विचार,प्रवाह आणि प्रयोग आणि तत्वज्ञान,
या मुळेच श्री.इनामदार यांनी या ग्रंथात विस्तृत प्रास्तविकात प्रतेक प्रकरणांच्या विवेचनामागिल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.संदर्भासाठी आणि विषय आकलानासाठीही ती उपयुक्त आहे.ते म्हणतात “—जस जसे लेख व टिपणे वाढत गेली तसतसे त्याला एका ग्रंथप्रकल्पाचे स्वरूप येत गेले:’आधुनिक दृश्यकलाविषयक साद्यंत व सर्वांगीण माहितीने परिपूर्ण असा,कलासदृश संदर्भग्रंथ ’- अशा स्वरूपाचा प्रकल्प ह्या लिखाणातून साकारत गेला.
ते पुढे लिहितात –“ नृत्य संगीत,नाटक,चित्रपट यां विषयीची प्रगल्भ सुजाण अभिरुची व आस्था मराठी रसिकानी पिढ्यान्पिढ्या जोपासली आहे.त्या तुलनेत चित्र-शिल्पादी दृश्यकलांच्या वाट्याला तशी उपेक्षाच आली आहे.मराठी –समाजात कला साक्षरता वाढीस लागावी,तसेच कला अभिरुचीचे पोषण व संवर्धन व्हावे या साठी अशा कलाविषयक पुस्तकांची नितांत गरज आहे.” व पुढे आज वर मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तके,लेख आदींचा या दृष्टीने झालेल्या प्रवासाची नोंद घेतात.
या अनुशंगाने मला असे वाटते की आजवर या अंगाने जाणिवपूर्वक विषेशत: चित्र-शिल्प आदींचा आस्वादक रसास्वाद किंवा ती समजून घेण्याची जन सामान्यांची क्षमता उंचावण्यासाठी, अगदी स्वच्छच सांगावयाचे म्हणजे कला प्रदर्शनाला यॆणारा, मिळाणारा प्रेक्षक त्यांची जाण समृध करण्यासाठी साठी कांही ठोस कार्यक्रम केले जात नाहीत. चित्रपट,नाटक,पुस्तके यांची समिक्षणे,परीक्षणे भरभरून लिहणारे चित्र-शिल्प प्रदर्शना कडे -बाबत फ़क्त बातमी म्हणून पाहतात. कलावंताच्या वाढीबरोबरच वाचक,प्रेक्षक ,श्रोतें यांचीही वाढ झाली पाहिजे.क्लिष्ट आणि जड म्हणून प्रेक्षकानी पाठ फ़िरवण्या ऐवजी त्यास जाणकारीने दाद दिली पाहिजे.
जागतीकीकरण,मुक्त अर्थ व्यवस्था आणि झपाट्यान विश्व व्यापून टाकणार संगणकाधारीत महाजाल , अतिरेकी चंगळवाद यातून तयार झालेला नव श्रीमंत ,विधिनिषेधशून्य, मध्यम वर्ग आणि त्याचा तुच्छतावाद आणि दुसरी कडे टोकाच्या जगण्याच्या लढाइमुळे बेमुर्वत बनलेला विवेक हरवत चाललेला बेभान समाज ही एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीची परिस्थिती.तर आ वासून उभे राहिलेले उन्मादी राष्ट्रवाद,टोकाचा अविवेकी संवेदनाशून्य धर्माभिमान - दहशतवाद, आतंकवाद आणि आयसिस ,तालिबान,अलकायदा या सारख्या कट्टर धर्मिक संघटना आणि त्यांचा अतिरेकी उच्छाद या साऱ्यातून उभे राहिलेले विस्थापितांचे पश्न या वैश्विक घटीततांच्या संदर्भात सर्वच कलांचा ,ललित कला ते चित्र ,शिल्प नृत्य व नव्या जुन्या कलाकृतींचा पुन: नव्याने अर्थ लावणे हे कला समिक्षकां समोरचे खरे आव्हान आहे.पिकासोंचे “Dream” वा दा व्हिंची यांची “Monalisa” असो.विशेषत:२००० नंतरच्या दशकातील पाश्चात समीक्षणातून यांचे वेगळे अर्थ,
वेगळी स्पष्टीकरण समोर येताहेत.
’एखादी कलाकृती ही ज्या युगात निर्माण होते त्या युगाचेगुणधर्म तिच्यात अप्रिहार्यपणे प्रकटत असतात.त्या त्या युगाच्या प्रेरणा व प्रवृती त्या युगात निर्माण होणाऱ्या कलेचे,कलाकृतीचे भवितव्या घडवत असतात. कलाकृतीच्या निर्मितीप्रक्रियेत निर्णायक घटक म्हणून ते सुप्त व अध्याहृतरीत्या कार्यरत असतात—’(प्रकरण-लिओनार्दोची मोनालिसा) याच भूमिकेचा विस्तार म्हणजे
उत्तर- आधुनिकतावाद : कला आणि वास्तुकला या प्रकरणाच्या निष्कर्शात ते लिहतात : ’ उत्तर-आधुनिक कलेने जुनी प्रस्थापित कला-सौन्दर्यमूल्ये नाकारली; पण त्या जागी नवी कलासौन्दर्यमूल्ये पुन:स्थापित केली नाहित.किंबहुना तसा त्यांचा उद्देश व भुमिका नव्हती.अभिजात व अभिजनवाद यांच्याविरोधात उत्तर-आधुनिक्तावादाने देशीवाद वा स्थान महात्मवादाचा पुरस्कार केला.त्यात लोकगटाच्या सहभागावर भर होता .बहुजन संस्कृतीचा पुरस्कार ह्या चळवळीने केला आणि तिच्यावर ग्राहकवादी,चंगळवादी मुल्यांचा पगडा होता.त्याच्या प्रभावामुळे कलाविष्कारात उथळपणा,सवंगपणा व थिल्लरपणा येत गेला.कला निर्मितीतील आत्मानिष्ठा,वृत्तिगांभीर्य व मूल्यवादी भुमिका याना कांहीच महत्व उरले नांही.कलानिर्मितीतून सुसंगतीचे तत्व हद्द्पार झाले व विसंगती हेच तत्वज्ञान बनले. कला आणि वास्तव यातल्या सीमा रेषा उत्तर –आधुनिक कलेने पुसून टाकल्या.-----वास्तव हे एक अराजक असते आणि ते विस्कळित असते;दुरुस्तीच्या पलीकडचे असते,त्याच्या ह्या अराजकाचा व गोंधळाचा आहे तशा स्थितीत स्वीकार करून त्यातील रूपहीनतेचा गौरव उत्तर –आधुनिक कलेने केला अहे.----
---
अभिजनांच्या उच्च संस्कृतीचे मूल्यनिकष ठरवून मोडीत काढल्याने कलानिर्मितीला कोणताच मुल्याधार उरला नांही.केवळ सवंगपणा,उथळपणा हिणकस व बाजारू रंजकता हेच कला निर्मितीचे निकष ठरले. कला ,सौंदर्य, साहित्य यांच्या स्वायत्ततेला उत्तर –आधुनिकतावादी कलेने आव्हान दिले आणि त्याच वेळी ग्राहकवाद,चंगळवाद यांच्या आहारी जाऊन व लोकाभिरूचिचा अतिरेकी अनुनय करून कलेला उपभोग्य वस्तुंच्या (कंन्झ्युमर गुड्स ) पातळीवर आणून ठेवले.” मात्र उत्तर –आधुनिक वास्तुकलेने ’उत्तर –आधुनिक कलेतील ’देशियता,स्थानमहात्म्य व लोकगटांचा सहभाग यांच्या समन्वयाने सकारात्मक,विधायक, व लोकाभिमुख जीवनसन्मुख वास्तुकलेचा अविष्कार साकारला’.
इनामदारांच्या या पुस्तकाचे हे एक आणखी वैशिष्ट की कलेच्या संदर्भात विचार करताना, त्यानी ’वास्तुकलेचा” कला म्हणून घेतलेला सांगोपांग आढावा. उत्तर-आधुनिक वास्तुकला (पोस्ट-मॉडर्न आर्कीटेक्चर) तिचा विकास ,अंतरंग ,अविष्कार आणि समीक्षा करताना त्यानी या क्षेत्रालील कला प्रवाह ,त्यात बंडखोरी करणारे ,वेगळ्या वाटा शोधणाऱ्या, अग्रणी वास्तुशिल्पज्ञांचा परिचयातून तपशिलवार विवेचन केले आहे.
दृष्कलेतील नग्नता असो वा बिभस्तता हे एका तीव्र मनोक्षोभक विद्रोहाच प्रतिकात्मक सादरीकरण असत.विशिष्ट सोवळ्या विचारांनी या साऱ्या कला- कृती व्हल्गर किंवा निम्न दर्जाच्या म्हणून बाजुला करणे संयुक्तीक ठरेल का ? हे म्हणण कदाचित एक सामान्य प्रेक्षक म्हणून जरा धाडसाच होइल ,पण साल्होदर दाली या थोर चित्रकारांची चित्रे त्यानी त्यांच्या पेंटींगची स्पष्टीकरण दिली नसती तर ती तितकीच बिभित्स आणि क्वचित ओंगळवाणीही वाटली असती.
म्हणूनच सर्व सामान्य प्रेक्षकांच्या आकलनासाठी चित्र आदि कलांवरचे या प्रकारचे ग्रंथ आवश्यकच ठरतात.
रूपबंध आणि रूपवादी समीक्षा व माध्यम विचार ही या ग्रंथातील दोन अत्यंत मह्त्वाची प्रकरणे. एकंदरीतच कला –दृष्य,दृकश्राव्य,संगीत,नृत्य वा साहित्य यांचा चिकित्सक ,विष्लेषक आणि अत्यंत अभ्यासू पणाने घेतलेला वेध आणि त्याची स्वतंत्र मांडणी विषेत: ललित साहित्या बाबत अमूर्तीकरणाचा बा.सी.मर्ढेकरांच्या ’रात्रीचा दिवस ”कादंब्रीचा प्रयोग आणि ललित साहित्या बाबत अमूर्तीकरणात असणाऱ्या मर्यादा ही विषेश उल्लेखनिय आहेत.
माध्यम विचारा बाबत त्यांच्याच पुस्तकात इतरत्र ( प्रभोधनयुगाचे शिल्पकार या प्रकरणात) आलेली दा व्हिंची आणि मायकेल एंजेलो या महान चित्रकार-शिल्पकारांची मते येथे उधृत करावीशी वाटतात.
“चित्रकला श्रेष्ठ की शिल्पकला श्रेष्ठ या वादावर :लिओनार्दो म्हणतात
’ शिल्पकार वापरतो ते द्रव्य-दगड,माती,लाकूड याना त्यांच्या अंगभूत मर्यादा आहेत.या उलट ,चित्रकाराचे रंग व कॅनव्हास चे माध्यम अधिक लवचीक आहे.रंगांच्या माध्यमातून चित्रकार जो आभास निर्माण करू शकतो,तस शिल्पकाराला करता येत नाही. सैनिकांच्या टापानी उडवलेली धूळ शिल्पात कशी दाखवणार ?चित्रकार मात्र हे सर्व दाखवू शकतो----
शिपकला हे माध्यम अधिक टिकाऊ आहे --- कारण हा त्या द्रव्याचा ( लाकूड,दगड,ब्रॉंझ,संगमरवर) गूण धर्म आहे.शिल्पकला ही यांत्रिक आणि मेंदूला कमी शीण देणारी आहे. ---ते शास्त्र नसून तंत्रविद्या आहे.तर चित्रकाराला बुध्दिमत्तेच्या जोरावर निसर्गाशी तादत्म्य पावून तंत्र व यथादर्शन आत्मसात करावे लागते –’
मायकेल ऍंजेलो :--- सर्वच कला आणि माध्यमे सारख्याच तोलामोलाची आहेत.त्यांच्यात तरतमभाव बाळगता येत नाही.,चित्रकला व शिल्पकला या दोन्ही समजून घेण्याच्या, समान जाणिवेतून विकसित झालेल्या कला आहेत.आणि त्यांच्यांत कलावंताने तरतम भाव व श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद बाळगता कामा नये.----
---आणि पुढे जाऊन मायकेल ऍंजेलो म्हणतात –’ कलानिर्मितीचा उद्गम ’एरॉस’ पासून-म्हणजे का्मदेवापासून होतो.एरॉसच्या प्रेमवृत्तीमुळे (प्लॆटोप्रणीत) मूळ चैत्यन्यतत्त्व वस्तुजात प्रतिबिंबामध्ये गुंतून पडते.या वस्तुजाताची अनुकृती करताना कलावंत हे क्षणैक भासमान होणारे तरल पण शाश्वत चैतन्यतत्व रंग,दगड,धातू या सारख्या जड आणि अशाश्वत साधानांमध्ये बंदिस्त करून ठेवतो.एरॉस या संयोगतत्त्वामुळे दैवी चैत्यन्य हे जडाच्या प्रेमात पडते.तोच एरॉस कलावंतामधून कार्यरत झाल्यामुळे कलावंत आपल्या ’जड’ माध्यमातून (रंग,दगड,धातू इ. )
हे सौंदर्य चिरस्थायी करतो’
----या विचारसरणीत व कलाविषयक भूमिकेत मायकेल ऍंजेलोनी कलानिर्मितीत गढलेल्या मनाच्या अथांग गूढतेचा (अर्थात आशयाचाही) ,तद्वत माध्यमसाधनांच्या आणि अमुर्त चैत्यन्य तत्त्वाला मूर्त स्वरूप देण्याच्या कलावंतामधिल ध्यासाचा,सारखाचा आदर केलेला दिसतो.”
संभाजी कदम यानी म्हटल आहे "कलावंताने आपल्या कलाकृतीचा आशय प्रत्यक्ष जीवनातूनच शोधायचा;पण कलकृतीत त्या जीवनभुवाचे साम्य असलेच पाहिजे असा अ्ट्टाहास बाळगायचा नाही;कलाकृती प्रत्यक्ष माधयमातून मुक्तपणे आकारास(साकार करत) आली पाहिजे.चित्रकार फ़क्त हाताने चित्र रंगवत नाही,तर तो त्याच्या अंतरंगातून ते रंगवून काढतो.एकदा का चित्र मनातून हातात आणि कागदावर आले,की ते स्वतंत्र बनते.त्याचे अनुभवाशी असलेले पाश तुटून जावे लागतात.दृश्य जाणिवेतूनच त्याचा आस्वाद घ्यायचा असतो.चित्रकलेतले हे फ़ार महत्वाचे सत्व आहे,दृश्यकलेतले हे जणू अध्यात्मच आहे "पृष्ठ ४६५
विशुध्द अमुर्त शैली च्या पुष्ठार्थ कॅंडिन्स्की पान ६०६-६०७ ----->
"कलावंताच्या अंतर्मनातील अध्याम्यवृत्ती व चित्शक्ती विशुध्द अमुर्त आकारांतून प्रकट होत असते---अमूर्त आकार हे निरंतर मुक्त आणि अक्षय आवाहक असतात.बाह्य पृष्टभागाखाली खोल दडलेल्या ,निसर्गाच्या आशय व सत्वा पर्यंत मानवाला घेऊन जाण्याचे नित्यनूतन सामर्थ्य अमूर्त आकारांच्या ठायी जात्याच अंगभूत असते आणि वस्तुसृष्टीच्या बाह्य आभासी रुपापेक्षा अमूर्त आकार हे अधिक अन्वर्थक व आशयघन असतात.--
--अस्सल कलाकृती ही अभिव्यक्तिक्षम )
एक्सप्रेसिव्ह)
असलीच पाहिजे.सखोल गहनगूढ भावाभिव्यक्ती वा आंतरिक आध्यात्मिक अनुभूती दृश्य माध्यमातून व्यक्त करण्याचे सामर्थ्य कलाकृतीच्या ठायी असलेच पाहिजे.तरच वरपांगी उथळ आलंकारिकतेपासून तिची सुटका होऊ शकेल.---
---कॅन्व्हासवरील रंगाकारांचे उपयोजन हे वृंदवादनातील स्वरलेखनपद्धतीप्रमाणे [नोटेशन]
सुसंवादी असले पाहिजे,तसेच ते पूर्व नियोजीत’सुनिश्चित व अचूक असले पाहिजे.चित्राची प्रतीकात्मक अमूर्त दृश्यभाषा ही एखाद्या गणिती सूत्रासारखी अचूक् व काटेकोर व नि:सदिग्ध असली पाहिजे,त्यात कोठेही भोंगळ सैलसर व अस्ताव्यस्त रंगरेषाकारांच्या पसाऱ्याला थारा असता कामानये.---
"
लेखकाने प्रस्तावनेत सूचीत केल्या प्रमाणे संदर्भ ग्रंथ म्हणून याच मूल्य निश्चितच आहे.पण संदर्भ ग्रंथांच्या बाबतीत अत्यंत आवशक आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा ,आकारविल्हे विषय,नाम आणि व्यक्तीनाम सूची व पारिभाषिक शब्द (इंग्रजी –मराठी) द्यावयास हवे होते.खरेतर मराठीत – अभ्यास विषयावरील खूपशा ग्रंथात , आत्मचरित्र, चरित्र (हे एक प्रकरचे त्या कालाचे दस्तऐवजीकरणच असत) आणि अशा प्रकारच्या इतर ग्रंथातही विषय,नाम व व्यक्तीनाम सूची द्यावयास हवी.इंग्रजी पुस्तकांच्या अगदी साध्या कमी पृष्ठांच्या लघू आवृत्तीतही ही शिस्त मात्र पाळलेली असते.या पुस्ताकातील पारिभाषिक विषेशनामांचे –चित्र-शिल्पकारांची नावे वा चित्र/शिल्पांची शीर्षके यांचे उच्चार ऑक्सफ़र्ड –डिक्शनरी प्रमाणे दिले असले तरी सर सहा प्रचलित उच्चारांप्रमाणे शोध घेताना इंग्रजीत नावे दिली नसल्याने व विषय,नाम व व्यक्तीनाम सूची नसल्याने जरी अनुक्रमणिका विस्तारपूर्वक दिली असली तरी एखाद्या चित्रकाराचा/चित्राचा संदर्भ शोधायला अडचण येते. एदवाद मंक/द/ड (Edvard Munch) (१८६३-१९४४)आणि त्यांच जगप्रसिद्ध चित्र “The Scream” (1893) ही मालिका यावरच भाष्य कोठे आढळल नांही-असेल तर नावाच्या गोंधळामुळे सापडल नसाव.
सर्वच (पुरुष) लेखकां प्रमाणे पाश्चिमात्य कलेच्या एवढ्या मोठ्या कालखंडाचा(इ.स.१४००ते२०००)आढावा घेताना स्त्री कलाकारांचा “नाम”मात्र ही उल्लेख का करावासा वाटला नाही हा प्रश्न पडतो.
लॉरांसा,मारी: ( १८८३- १९५६) हरहुन्नरी चौफ़ेर व्यक्तिमत्वाच्या फ़्रेंच चित्रकर्त्या,कवयत्री आणि Avant-Garde कलाकांरांच्या परिमंडळातील एक सद्स्य.
फ़्रिदा काहलो(Frida Kahlo de Rivera) (१९०७-१९५४) बंडखोर मे़स्किकन अतिवास्तवादी चित्रकर्त्या.
शुर्मान अना मारिया व्हान - Anna Maria van Schurman/
Schurmann /Schuurman (१६०७-१६७८)
जन्माने जर्मन-फ़्लेमिश शिक्षणतज्ञ,विषेशत: स्त्री शिक्षणाच्या पूरसकर्त्या, धर्मोपदेशक,भाषातज्ञ व चित्रकार.
स्कॅपिरो,मिरियाम(Schapiro,Miriam)(१९२३)अमेरिकन,चित्रकार,शिल्पकार,मुद्राचित्रकार,व फ़ेमागिस्ट"femmagist", कट्टर स्त्रीवादी व प्रकॄती(स्त्री)कलेच्या प्रवक्त्या,स्त्रीकला इतिहासकार.
हेसे, इव्हा ( Hesse,Eva ) (१९३६ – १९७०) अमेरिकेतील १९६० च्या दशकातील पोस्ट मिनिमल आर्ट कलाप्रवाहाची पुरस्कर्त्या, स्वछंद ,स्वतंत्र,प्रयोगशील आणि स्वंयभू ,चित्रकार,‘
भौमित्तीक व विषेशत: कामसंवेदनांच सूचक निर्देशन करणाऱ्या आकृतीबंधामुळे कला जगतात नाव झालेल्या शिल्पकार.
हेपवर्थ,बार्बारा :(१९०३-१९७५) ब्रिटिश चित्रकार-शिल्पकार.ब्रिटिश आधुनिक /नवचित्र –नवशिल्प व अमूर्त शिल्प कलेच्या प्रणेत्या,
समकालिन शिल्पकार इव्हॉन हिचेन्स,हेन्री मूर,बेन निकोल्सन ,नाउम गाबो यांच्या बरोबरीने त्यांच नाव सन्मानान घेतल जात.
मारी कासे (Mary Stevenson Cassatt (१८४४-१९२६) पारंपारिक ’मॅडोना आणि चाइल्ड’ तून मोकळ होत आई आणि मूल यांच्या रोजमर्दाच्या जीवनातील क्षणां च्या चित्रणातून अंतर्मनाचा अविष्कार करणाऱ्या व देगास सारख्या इंप्रेशिनिस्ट चित्रकारांच्याकडून शिक्षण आणि दाद मिळवणाऱ्या अमेरिकन इंप्रेशिनिस्ट नवचित्रकर्त्या.
या आणि यांच्या सारख्या इतर स्त्री कलावंतांच या क्षेत्रात (अमूर्त ) चित्र- शिल्प कलेच्या विकासा साठीचे कांहीच योगदान नाही का?
सर्वच लिखाण मूलत: युरोपियन –विषेत: इटली/फ़्रांन्स च्या आवती भोवती केंद्रीत झाल असून संदर्भासाठीचा मुख्य आधार हा इंग्रजी पुस्तकांचा असल्याने सुद्धा “स्त्री”यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झालं असाव.
जाता जाता एक विचार मांडावा वाटतो. अशी पुस्तके नेहमी गतकालातील कलाकारांवरच का लिहली जातात? समकालीन, तरूण कलाकारावर असे एखादे पुस्तक लेखकांकडून अपेक्षित आहे. भाषेवर असलेल प्रभुत्व,विषयाची आवड आणि शास्त्रोक पध्दतीने केलेली मांडाणी या मुळे हे लिखाण सामन्य वाचकांची समज –जाण एकंदरीन वाढवण्यास मदत करतच,पण या चित्र,शिल्प सारख्या दृष्य कलांच्या कडे पहाण्याची एक अभ्यासू दृष्टीही आणि रस निर्माण करण्य़ातही ते यशस्वी होईल.आस्वादक प्रेक्षक ते जाणकार या दिशेने प्रवासास हे लिखाण नक्कीच सहायभूत होइल.
ग्रंथातील पुनर्वृत्ती टाळली असती तर पृष्ठ संख्याही कमी झाली असती आणि किंमतही
रूपगंध : एस.डी,इनामदार -प्रतिमा प्रकाशन-पुणे,जानेवारी २०१५
वरील
परिक्षणात उल्लेख केलेल्या कांही स्त्री चित्रकारावरील लेख या
ब्लॉग वर देत आहेच,.
** दुर्गा महिषासूर मर्दानी-राजपूत शैली –मध्य १८ वे शतक –न्यूयॉर्क मधिल खाजगी संग्रहालयात.
-ऋण निर्देश - डॉ.स्टेला क्रॅमारिश –“द आर्ट ऑफ़
इंडिया –थ्रु द एजीस “ ३ री आवृत्ती -१९६५ मधुन
राजपुत कला ही
राजेशाही, दरबारी कलेहून भिन्न आहे.ही कला
सुसंस्कृत,अभिरुचीपूर्ण,उत्स्फ़ुर्त,स्वाभाविक आहे .चिंतन दृढ विचारातून पारंपारिक
पद्धतीना धरून आपल्या आश्रयदात्या
राजे,महाराजे यांच्याआनंदासाठी ,ती व्यक्तिगत जिव्हाळातून संपन्न झाली होती.एखादा
कलासक्त राजकुमाराला बंधनातून् मुक्तीचा आनंद देण्या इतकी ती प्रगल्भ होती.
स्व-नाम-खास
शैली ,भिन्न वैशिष्ट्यानी संपृक्त अशी राजपूत शैलीची विविध घराणी विविध भागात
होती.
प्रथम दर्शनी
पोथी -पुस्तकातील पानासारखी भासणारी राजपूत चित्रे – ना विषय
स्पष्टिकरणारी-ईल्यसस्ट्रेशनस सारखी होती ना लघुचित्रा सारखी होती(आहेत).मात्र या
दोन्हीतून समन्वय साधुन भित्तीचित्राच
उद्दातीकरण या शैलीत साधलं होत(आहे)..
वास्तुशास्त्र-शिल्पशास्त्र
या दृश्य कलेवरील प्रचिन भारतीय ग्रंथातून चित्रकारानी चित्र रंगवताना-काढताना
–शिल्प चित्र साकारताना कांही अपेक्षा-नियम सांगितले आहेत आणि भरतीय कलाकारानी ही परंपरा सांभाळून आपली
स्व शैली विकसित केली होती
देह बंधाकृतींचा
ताल,तरलता आणि सौष्ठव चित्रात उतरल पाहिजे.
ही कलाकृती- ही प्रतिमा जणू जीवंत असून श्वासोश्वास करते आहे , जीवनांचा हा जोरदार प्रवाह, त्या देह्प्रतिमेतून व्यक्त करता आल पाहिजे.जीवनांचा जोश-प्राण चैत्यन्य-आवेग याच प्रवाही चित्रांकन करतानाच त्या
देह प्रतिमेत भाव भावनांचही अविष्करण
दृगोच्चर झाल पाहिजे..चित्रकाराला सुक्ष्म निरिक्षणातून
,कल्पनाविलास आणि भाव यातील तोल,तरलता आणि आवेगाच
चित्रण करता येण मह्त्वाच आणि आवश्यकही आहे..
अवकाश आणि यथार्थ दृषांकन चित्रणाला अत्यंत मह्त्व आहे.,
राजपूत शैलितील
’दुर्गा महिषासूर मर्दिनी “ या कलाकृतीत ही सारी पारंपारिक शिस्त पाळूनही त्यात
कोण्ताही साचेबद्धपणा आढळत नाही.नाजुक ,प्रसन्न रंग छटात प्रवाही,तरल शैलीतील या
चित्रातला जोशही तितकाच उजागर झाला आहे.
’नव -आधुनिक कला -विचार,वैशिष्टे’ या आधीच्या लेखातील आणि वरील परीक्षण-परिचय लेखातील व्यक्त केलेल्या
विचारांच्या परिप्रेक्षात “राजपूत शैलीतील
दुर्गा महिषासुर मर्दानी ’हे चित्र तुम्हाला कसे वाटते ?
आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत !
Comments
Post a Comment