AMRITA SHERGIL-अमॄता शेरगील
अमॄता शेरगील
विलक्षण प्रतिभेच्या,मनस्वी,मुक्त,स्वतंत्र व्यक्तीमत्वाच्या,संवेदनाशील,बंडखोर आणि नामवंत भारतीय चित्रकार.
अमॄता शेरगील त्या काळातील प्रचलीत समकालीन युरोपीयन कला व कला प्रवाहाच्या बरोबरोबरीच्या, आधुनिक चित्रकलेच्या प्रवाहातील अवंत गार्द चित्रकारांच्या समकक्ष ! त्यांची कला केवळ पाश्चिमात्य विषेत:युरोपच्या विश्वाच्या पलिकडील कलाकार म्हणून उणावणे अन्यायकारकच ! अस म्हण्टल जात की १९३० च्या दशकातील भारतातातील कला व प्रवाहाच्या मात्र त्या३०वर्षे पुढे होत्या.
फ़्रांस मधील वास्तव्यात कलाशिक्षणाच्या बरोबरच, पारिस मधील स्वतंत्र - मुक्त जीवनशैलीशी त्यांचा परिचय झाला.तरूणपणातील फ़्रांन्स-पारीस मधल्या या वास्तव्यातील बोहामिनियन अत्यंत्य स्वच्छंदी मुक्त जीवनशैलीचे त्त्याना विलक्षण आकर्षण होत-आणि त्या जगल्याही तस्याच.!
यौवनाच्या उंबरठ़्यावरच्या कोवळ्या तरूण वयात अमॄताना भारता बद्दल एक आंतरीक ओढ जाणवत होती,पारिस मधे शिकत असतानाच त्यानी भारत हेच माझ अंतीम श्रेयस आहे,भारताशी माझ दैव जोडल गेल आहे असे त्या म्हणाल्या होत्या.
.संपूर्णपणे पाश्चात वातावरणात, संस्कारात आणि विचरसरणीत वाढलेल्या अमॄतांची भारतात परतण्याची तीव्र ईच्छा त्यांच्या आई-वडिलाना धक्का देणारी तर होतीच पण अमॄतांच्या भावी कारकिर्दीच्या दॄष्टीनेही त्याना हा निर्णय योग्य वाटत नव्हता.
न शमणारी ज्ञान पिपासा,जिद्द, अपार कष्ट करायची तयारी,चिकाटी ,दॄढ निश्चय,धेय्याशी एकनिष्ठता ,कलेवरील अव्यभिचारी प्रेम आणि जबर आत्मविश्वास; महान कलाकार होण्यासाठी आवश्यक असणारे हे सारे गुण या २२ वर्षाच्या तरूण युवतीकडे होते;तंत्रावर हूकमत मिळवलेल्या अमॄता १९३४ ला भारतात परतल्या व त्यानी ग्रीष्मातील देशाच्या राजधानीत,सिमल्यात आपला स्टूडिओ थाटला.
अमॄताना जाणीव होती की येथे त्याना संपूर्ण भारतीय,हिन्दुस्तानी म्हणून स्वीकारले जाणार नाही, हिन्दुस्तानी अंतरवर्तूळात प्रवेश मिळणार नाही,हिन्दू स्त्रीच्या भाव विश्वात ठाव मिळणार नाही,आपल्या अंतरंगीचे गुह्य या स्त्रीया आपल्यापाशी मोकळ्या करणार नाहीत.आपली नाळ या उच्च,समॄद्ध संस्कॄतीशी जुळवून घेण्यासाठीतील पहिली पायरी म्हणून त्यानी अगदी बिंदी(कुंकूवा)सह संपूर्ण भारतीय वेषभूषा स्वीकारली होती.त्या काळी, त्यांच्या वयातील इतर सर्वसामान्य हिंदू मुलींची लग्ने होवून त्याना मुलही झालेली असत;मध्यम वा श्रीमंत घरातील स्त्रीया शिकल्या तरी स्वतंत्र व्यवसाय वा नोकरी ही त्यांच्या करीता अशक्यच गोष्ट होती.फ़क्त नीम्न आर्थिक स्तरातील/कामगार वर्गातील स्त्रीया अर्थांअर्जनासाठी घराबाहेर काम करताना दिसत आणि ते ही मुख्यत: शारीरीक श्रमाचेच असे.या पार्श्वभूमीवर अमॄतांचा चित्रकार होण्याचा निर्णय,त्यांची स्वच्छंदी,मुक्त जीवन शैली हे सारं येथील लोकांच्या कुतुहलाच व अचंबीत करणार होत.
आंतरीक ओढीने भारतात परतलेल्या अमॄतांच्या स्वप्नातील भारतमातेची सुडोल,पुष्ट,घाटदार,कमनीय प्रतिमा व समोर आलेल जळजळीत वास्तव याने हळूवार,भावूक,संवेदनाशील अत:करणाच्या अमॄतां व्यथीत झाल्या.
या देशाचा,समाजाच्या अंत:प्रवाहाचा,अंतरंगाचा वेध घेण्या करीता या वास्तवाला सामोरं जावून ते चित्रांत बद्ध करण्यासाठी त्यांचा कुंचला सिद्ध झाला.त्यानी आसपासच्या डोंगरी भागातील कॄश,दारीद्र्याने गांजलेल्या गरीब स्त्री पुरूषांची,जन समुदायांची चित्रे रंगवायला सुरूवात केली.
शेरगील,अमॄता: जन्म :३० जाने १९१३ बूदापेस्ट हंगेरी मॄत्यू: ५-६ डीसेंबर १९४१ लाहोर.
मजीथीया या पंजाब मधील गावाचे जाट सरदार उमराव सिंग शेरगील आणि हंगेरीयन ज्यू मेरी ऍंटोनेट गॉटेस्मान Marie Antoinette Gottesmann यांची जेष्ट कन्या म्हणजे अमॄता शेर गील; तर दुसरी कन्या म्हणजे चित्रकार विवान सुंदरम यांच्या आई इंदिरा सुंदरम (शेर-गील) होत.मेरी ऍंटोनेट गॉटेस्मान Marie Antoinette Gottesmann यांच्या शी विवाह केल्यावर ती दोघे हंगेरीला गेली.अमॄतांचा जन्म बुदापेस्तचा.अमृतांच बालपण हंगेरितील Dunaharasti या खेड्यात गेल.वडील उमराव सिंग हे पिढीजात आमीर,खानदानी श्रीमंत सरदार; तत्वज्ञानाचे अभ्यासक, संकॄतचे जाणकार,पर्सियन ,उर्दु इ.भाषातही पारंगत;तर आई मेरी ऍंटोनेट या गायीका व उत्कॄष्ट पियानो वादक होत्या.पहिल्या महायुद्धामूळे हंगेरीतच अडकून पडलेले हे कुटुंब १९२१ ,म्हणजे अमॄता ८ वर्षाची असताना सिमल्याला भारतात परतले.
या सुमारासच अमृतांना चित्रकलेत गोडी वाटू लागली होती.त्यांची संगीत,चित्रकला व इंग्रजी ची खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानी त्यांच्यातील अलौकीक प्रतीभा व कला गुण ओळखले व त्यांना इटलीला पाठवण्याचा सल्ला दीला.१९२४ ला अमृता ला घेवून मेरी ऍंटोनेट इटलीला गेल्या.येथे त्यानी अमॄताना रोमन कॅथॉलीक संस्थेच्या Santa Anunciata या शाळेत दाखल केले.कॅथॉलीक शाळेच्या कडक शिस्तीवर नाराज असणाऱ्या अमॄतांच त्यामूळे शाळेत लक्ष लागत नव्हतच. या काळात अमॄताना अनायसेच महान इटालीयन दिग:ज कलावंतांच्या कलाकृती पहाण्याचा योग आला.चित्रकलेत त्या अधिक रस घेऊ लागल्या.त्यांच्यातील सूप्त कला गुणाना नकळत खतपाणी मिळाल,चित्रकलेकडे त्या अधिकच आकर्षित झाल्या.१९२७ ला सिमल्यात (भारत) परतल्यावर त्यानी ऎरविन बकले Ervin Backlay यांच्याकडे चित्रकलेचे पाठ घ्यायला सुरूवात केली.पण त्यांचा (चित्र) विषयाचा यथार्थ,हूबेहूब,नक्कल करण्याचा आग्रह अमॄताना चीड आणी,त्यामूळे ही शिकवणी अल्प काळच चालली. तंत्रशुद्ध,घोकंपटीच्या,शिक्षणाबद्दल बाळपणीच त्यांच्या मनात तीट्कारा उत्पन्न झाला होता.रूढ,पठडीबंद,चाकोरीबद्ध शिक्षणात त्यांच मन रमण शक्यच नव्हत.त्यामुळे रूढार्थाने त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलच नाही.
कला,सरस्वती च्या बरोबरीने लक्ष्मीचाही वरदहस्त लाभलेल्या या सुसंकॄत कुटुंबाने अमॄतांच्या उपजत कलागुणाना प्रोत्साहन देण्यासाठी, संधी/अवसर मिळावा आणि योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने १९ एप्रील १९२९ ला पारीसला प्रयाण केले.अमृताना संगीतातही चांगली गती होती आणि त्या पियानोही उत्तम वाजवायला शिकल्या होत्या.त्यांच्या आईंची ईच्छा अमॄताने संगीतात कारकीर्द (घडवावी) करावी अशी होती,पण अमॄतानी चित्रकला हेच आपल आयुष्याच धेय निश्चीत केल होत.पारिस मधे अमॄतानी प्रथम Pierre Vaillant यांच्याकडे Grande Chaumiere येथे चित्रकलेचे पाठ घेतले. षोडसवर्षीय अमॄतांची चित्रकलेतील प्रगती पाहून, वयाची अट शिथील करून त्याना पारीस मधील Ecole des Beaux Arts येथे प्रवेश दिला गेल होता. त्यानी Ecole des Beaux Arts मधून फ़ाइन आर्ट्स मधील पदवी घेतली.याकाळात Lucien Simonहे प्राध्यापक म्हणून अमॄताना लाभले होते.पारिस मधील वास्तव्यात अमॄताना आधुनीक चित्रकलेच्या सर्वांगीण अभ्यास करता आला.दॄकप्रतयवादी चित्रकारांच्या impressionists कलाकॄतीनी त्या भारावून गेल्या होत्या.प्रारंभीच्या काळात त्यांच्या शैलीवर पॉल गॉंग्या (Paul Gaugein) सेझान यांचा प्रभाव जाणवतो,पण विन्सेंट व्हॅन गॉखने मात्र त्याना संमोहित केले होते.
फ़्रांस मधील वास्तव्यात कलशिक्षणाच्या काळात त्या फ़्रेंच भाषा अस्खलीत बोलायला व लिहायला शिकल्या,येथील सार्वजनीक जीवनाशी मिसळून गेल्या.त्यांचे मित्रमैत्रीणींचे वर्तुळ विस्तारले गेले. या काळात त्यानी कित्येक रेखाटने केली,तैलरंगात व्यक्तीचित्रे रंगवली.
पूर्वेकडील ऊगवतीच्या स्वछ,उजळ,लखखीत रंगछटा,तीव्र छाया-प्रकाश चितरण्यासाठी अमॄतांची रंगसंगती,संयोजन सुयोग्य आहे अस मत Ecole des Beaux Arts येथिल त्यांच्या एका प्रशिक्षकाने व्यक्त केले होते.
जिज्ञासू अमॄतांनी भारतातील गर्भ श्रीमंत,उच्च कलेच्या हरवलेलेया दूव्यांशी साधा जूळवण्याकरीता,या ठेवाच्या शोधासाठी भटकंती सुरू केली.अजंठा-वेरूळ च्या टवटवीत,प्रफ़ुल्ल रंगानी,लोभस नाविण्य पूर्ण कमनीय आकॄती बंधानी त्याना संमोहित केल.कोचिन मधील मट्टनचेरी राजवाड्यातील रमणीय,देखण्या भित्ती चित्रानी त्यांच्या मनात घर केल.मथुरेतील कुशाण कालीन शिल्पातील सामर्थ्याने त्या भारावून गेल्या.प्रत्यकारी,रेखीव भावूक बाशोली-पहाडी लघूचित्र शैलीच्या तर त्या प्रेमातच पडल्या होत्या. या अनुभवातून सूक्ष्म जाणकारीने अभ्यास करून, त्यांना हवी असणारी चित्रांकनातील सहजता( सुलभता) त्याना साधता आली,त्यांनी स्वशैली विकसीत केली.खास वेगळी,अमॄतांच वैशिष्ट्य अधोरेखित करणारी ही चित्रशैली पूर्णपणे भारतीय आणि स्वतंत्र होती..मूलत: भारतीय चैतन्य हा या शैलीचा मूळभूत पाया तर अविष्करणांत चित्रविषया पासून ते तंत्र,रंगासह सर्व अस्सल १००%. हिंदूस्तानी.त्या कोणाचे अनुकरण किंवा नक्कल करणे तर शक्यच नव्हते
पारिस मधे १९३३ मधे त्यानी रंगवलेल्या ’दी टोर्सो’ या अनावॄत्त पाठ्मोऱ्या स्त्रीच्या चित्रातील कुशल रेखांकन,धीट मांडणी व सफ़ाइदार रंगलेपन या मूळे हे चित्र म्हणजे चित्र कलेचा एक आदर्श नमूना म्हणून ओळखल जाते.जाणकारांच्य बरोबरीने रसिकांचीही दाद वाहवा मिळवणाऱ्या या चित्रातून कोवळ्या वयातील अमॄतांच या माध्यमावरील प्रभूत्व-विलक्षण प्रतीभा प्रतयाला येते.
१९३४ मधील ’कॉनव्हर्सेशन’(यंग गर्ल्स)’या चित्रमूळे त्यांची Associate of the Grand Salon of Paris म्हणून निवड झाली.या बहूमानाने सन्मानीत झालेलेल्य अमॄता शेरगील या आज वरच्या सर्वात तरूण व पहिली आशियाइ व्यक्ती होत.सिमला वार्षिक महोत्स्वातील स्पर्धेसाठी त्यानी आपली चित्रे पाठवली होती.यातील कांही चित्रे परीक्षकानी परत केल्या मूळे,परीक्षकांच्या कला ज्ञानाबद्दलच शंका व्यक्त करून अमॄतांनी आपली सर्वच चित्रे स्पर्धेतून काढून घेतली होती. २० नोव्हे.१९३६ ला मुंबईत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले. समीक्षक आणि रसिकां कडून त्यांच चांगल स्वागत झाले.टाईम्स ऑफ़ इंडिया सारख्या प्रतिष्टीत वृत्तपत्रानाही त्यांची आवर्जून दखल घ्यावी लागली होती. झपाटून जावून अमॄतानी चित्रे रंगवली.रंग हा त्यांचा अंतरीचा रावा होता;पहिलं प्रेम होत.सतत नवनवीन प्रयोगातून रंगांच्या विविध शक्यता हातळत त्यानी कलेला वेगळे आयाम दीले, आकार व रंगलेपनात सहजता तर रंगछटांच्या संयोजनावर प्रभुत्व प्रस्थापीत केल होत.ज्या आंतरीक ओढीने त्या येथे परतल्या होत्या आणि त्यांच्या संवेदनाशील मनाला जे जाणवल,भावल तेथून त्यांची येथील कला साधना सुरू झाली.
अमॄतांच्या चित्रात उभट, लांबोडके,कॄश,दारिद्य्राने खचलेले-दबलेले,फ़ाटक्या तुटक्या कपड्यातील शून्यमनस्क स्त्री पुरुष,माणसांचे घोळके दिसतात.या लोकांचे डोळे भकास आणि नजरेत नैराश्य, नियतीशरणता दिसते.
पारिस मधील न्यूड व्यक्ती चित्रां( ’टॉर्सो’,’रेक्लायनिंग न्यूड’) कडून कंगाल स्त्री-पुरूषांच्या चित्रंकनाकडचा हा प्रवास त्यांच्या बदलेल्या मानसीकतेचा, परिवर्तनाचा द्दोतक होता.अमॄतानी प्रसन्न रंगात निसर्ग चित्रे रंगवली,रोजच्या जीवनातील प्रसंग रंगवले, माणसे ,त्यांचे समूह चितारले,घरगूती, धार्मीक प्रसंगातील व्यक्तींचे भावाविष्कार आपल्या चित्रात बद्ध केले.रंगचित्रांचा एक समॄद्ध ठेवा निर्माण केला. शिल्प मात्र त्यानी एकच घडवले.
अतीशय व्यस्त,मुक्त आणि स्वछंदी आयुष्य जगणाऱ्या अमॄताना सतत एकट,असुरक्षीत वाटत असे.खाजगी जीवनातील वैफ़ल्य खीन्नता आणि आंतरीक विषण्णता कदाचीत त्यांनी आपल्या चित्रविषयांच्या डोळ्यातून मांडली असेल.
हे दुबळेपण,परावलंबीत्व आणि असुरक्षीततेची भावना यातून आधार शोधण्यासाठी त्यानी १६ जुलै १९३८ रोजी,आई वडिलांच्या मनाविरूद्ध डॉ.Victor Egan या मावस भावाशी बुडापेस्त,हंगेरी येथे विवाह केला.२ जुलै १९३९ ला हे जोडपे भारतात परतले.अमॄतांचे काका सुंदर सिंग मजीथीया याचां सरया येथे साखर कारखाना होता.तेथे डॉ.व्हिक्टर एगन यांची त्यानी वैदयकीय अधीकारी म्हणून नेमणूक केली.सरयाच्या वातांवरणात अमॄतांच्या सॄजनतेला बहर आला त्यानी प्राण्यांची आणि निसर्गांची मनसोक्त चित्रे काढली होती.
व्हिक्टर एगाननी लाहोर येथे स्वत:चा दवाखाना सुरू करायच ठरवले व १९४१ च्या सप्टेंबरात अमॄतानी तेथे घर थाटले.३० नोव्हें १९४१ च्या एका मेजवानीतून परतल्यावर अमॄतांची तब्येत बिघडली आणि हा आजार विकोपाला जावून त्यातच ५-६ डिसेंबर,१९४१ ला अवघ्या केवळ २९ वर्षी त्यांचे निधन झाले.
चतुरस्त्र प्रतिभेच्या अमॄताना काव्यात गती होती,इंग्रजी बरोबरीने फ़्रेंचवरही त्यानी प्रभुत्व मिळवल होत.संगीताची जाणकारी होती,समीक्षात्मक दॄष्टी होती.स्वत:च्या कलाकॄतींची कठोर चिकीत्सा, परीक्षण करण्या इतपत पारदर्शकता होती.स्पष्ट वक्तेपणा आणि आपली मते परखड पणे मांडण्याची हिंमत होती. समकालीन बंगाल चित्र शैली वरील त्यांचे भाष्य प्रसिद्ध आहे. चित्रकले सारख्या दॄष्य कला माध्यमाचे,कलाकॄतींचे पॄथककरण करण्य़ात,विविध अंगाने आस्वाद घेण्यात त्याना रस होता. चित्रकलेच्या विकासासाठी त्यानी आपली मते वेळोवेळी पत्रातून ,वॄतपत्रातून व्यक्त केली आहेत. मात्र राजकारणापासून,विषेत: अंतीम टप्यात आलेल्या भारतीय स्वातंत्रा लढ्या पासून अलग राहील्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो.
या क्षेत्रातील त्यानी दिलेलेया योगदाना मूळे भारतीय कला जगताला नवसंजीवनी मिळाली.कित्येक भारतीय चित्रकार अमॄतां शेर गील यांच्या मूळे प्रभावीत झाले,कित्येकानी त्यांच्या पासून स्फ़ूर्ती घेतली,अनुकरणाच्या पहिल्या उर्मीतून बाहेर येवून नव्या वाटा शोधल्या.नवीन कलाकारंच त्या नेहमीच स्फ़ुर्ती स्थान राहील्या आहेत.
१९९३ ला रंग मंचावर आलेल्या ’तुम्हारी अमॄता’ या जावेद सिद्दिकी लिखीत शबाना आझमी व फ़ारूख शेख अभिनीत प्रसिद्ध उर्दू नाटकाच प्रेरणास्थान अमॄतांच होत्या.
भारत सरकारने त्यांची चित्रसंपदा हा अमुल्य राष्ट्रिय ठेवा म्हणून जाहीर केला आहे. त्यांची बहुतांश चित्रे ’नॅशनल गॅलरी ऑफ़ मॉडर्न आर्ट’,नवी दील्ली येथील संग्रहालयात जतन करून ठेवली आहेत.दील्लीतील एका रस्त्याला ’अमॄता शेरगील मार्ग’ असे नाव दीले आहे. १९७८ ला टपाल विभागाने ’हिल वूमेन’ हे चित्र तिकीटावर छापून त्यांच्या गौरवार्थ प्रस्तूत केल होत. आजही जगभरातील कलाजगताला आणि रसिकाना त्यांची कला भुरळ पाडते,मोहित करते
.’टेट नॅशनल म्युझियम ऑफ़ मॉडर्न आर्ट्स’,लंडन येथे २८/०२/२००७ ते २२/०४/२००७ या दरम्यान त्यांच्या चित्रांचे सिंव्हावलोकनी प्रदर्शन आयोजीत केले गेले व तेथे व्हिव्हान सुंदरम याना खास आमंत्रीत केल होत. २००६ च्या परदेशातील लिलावात त्यांचे ’विलेज सिन’ हे चित्र तब्बल ६ कोट ९० लाख रूपये इतक्या बड्या किंमतीला विकल गेल.आख्याईका बननेल्या अमॄता शेर गील यांच्या बद्दलच औत्सक्य कायम आहे. जगभरात रसिक,अभ्यासक उत्साहाने,प्रेमाने त्याच्यां जीवनाचा ,गूढ व्यक्तीमत्माचा आजही वेध घेत आहेत.
फ़्रिडा काहलो या श्रेष्ठ मेक्सिकन चित्रकार आणि अमृता शेरगिल यांची तुलना केली जते,किंबहूना अमृताना भारताच्या फ़्रिडा काहलो म्हटल जात.पण हे संयुक्तिक नाही..मूळातून काहलो यांची कला ही वैयक्तिक व्यथा वेदनेचा हुंकार अधोरेखित करते तर अमृतांच्या कलेत स्वत:च्या व्यथा वेदने बरोबरोरच इतरांबद्द्लची कणव आणि सहवेदनेचा उद्गार दृगोचर होतो.
जयंत लीलावती रघुनाथ
Comments
Post a Comment