PATTA CHITRA -BALIGHAT पत्तचित्र-पट्टचित्र(चित्रमालिका) व बालिघाट चित्र
पत्तचित्र-पट्टचित्र(चित्रमालिका) व बालिघाट चित्र
पत्तचित्र ,पट्टचित्र(चित्रमालिका ) व बालिघाट या ’लोककलांमधे ’ हिंदू देवदेवतांची ,पुराण कथांवर आधारीत चित्रे प्राकृतिक रंगानी रंगवण्याची प्राचिन परंपरा आहे. ती भारतभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या प्रकाराने ओळखली जाते.
भारतात ताडाच्या पानांचा चित्रफ़लक म्हणून वापर करण्याची प्राचिन परंपरा आहे.
या कलाकृती मुख्यत:तीन प्रकारच्या असतात.
१. तालपत्त चित्र : ताडपत्रावर रंगवलेली चित्रे
२.पटचित्र-चित्रमालिका : कापडावर रंगवलेली चित्रमालिका
३. भित्तीचित्र : भिंतींवर रेखलेली-रंगवलेली चित्रे
ओडिसातील पुरीच्या जगन्नाथाच्या- चित्रांकनातून –प्रचार,प्रसार यातून १५-१६ व्या शतकात सूरू झालेल्या या लोककलेच्या स्वरूपात आजपर्यंत तसा कांही मूलभूत फ़रक झालेला नाही,मात्र कांही नवे प्रयोग केले जात आहेत.
जगन्नाथा बरोबरच ,रामायण –महाभारत व पौराणिक कथा या लोककलांचा मुख्य विषय राहिला आहे नंतर राजे महाराजांची स्तुती-गौरव चित्रे, प्रादेशिक नृत्यावर आधारीत चित्रे याच बरोबरीने कुलदेवतांच्या प्रतिमा आणि राधाकृष्ण,सरस्वती,दुर्गा आणि गणपती यांनाही या लोककलेत सामावून घेतलं गेलं.
राजस्थानातील काही आदिवासी जाती –जमातीत त्यांच्या दैवतसमान गुरूंच्या चरित्रावर आधारीत चित्र मलिका रंगवण्याची परंपरा आहे.
वरील सर्व लोककलातील चित्रे रंगवण्या साठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.पाने,फ़ुले,हळद,विड्याची पाने,कात,चुना,माती आणि नैसर्गिक डिंक या पासून हे रंग तयार करतात.कुंचल्या साठी खारीच्या शेपटीचे किंवा बोकडाच्या मानेवरचे केस वापरतात.
टवटवीत ,उजळ आणि प्रसन्न रंग हे या कलाकृतींच वैशिष्ट असून आल्हादायक रसंगती ,एकाच अंगाने रेखांकीत मानवाकृती ,सजावटी साठी पाने,फ़ुले,वृक्ष यांच्या सह मानवाकृतींची गुंफ़णही कांही कलाकृतीत दिसून येते.
पत्तचित्र
ओरीसात ताडपत्रांना जोडून त्याच्या चौकटी तयार करून त्यावर चित्र रंगवतात .जगन्नाथ,बलराम आणि सुभद्रा यांचीही पत्तचित्रे आता मिळू लागली आहेत त्याना खूप मागणी आहे. ओरिसामधे पुरी जवळील रघुरामपुर या छोट्या गावात जवळ जवळ २०० कुटुंब नवनव्या प्रयोगातून या कलेच्या जतनासाठी झटत आहेत.
पट्टचित्र-मालिका
बंगाल मधील प्राचीन लोककला ,चित्रकारीची सहज शैली, रेखांकन ,रंगांचे उत्तम संयोजन आणि अवकाशाचा अचूक वापर या मुळे जगभरातील कलाप्रेमी या लोककलेचे नेहमीच कौतुक करत असतात.पट्ट म्हणजे संस्कृत मधे कापड.ही चित्रे रंगवणाऱ्या कलाकाराना “पटूआ” म्हणतात.पटूआ फ़क्त ही चित्रे रंगवत नाहीत तर गाणं गात गात कापडी(गुंडाळी ) चित्रफ़लक प्रेक्षकांना उलगडून दाखवतात.त्यां चित्रमालिकांच्या अनुशंगाने गावो गावच्या लोकांसमोर संयुक्तित कथा कधी नाचत,गाणे म्हणत, निवेदनातून सादर करतात.या गाण्याना “पटेरगीत “ अस संबोधल जात.या गाण्यात पुराण कथावर आधारीत कथा आणि आदिवासी जाती जमाती, अर्वाचीन भारताचा इतिहास पासून सद्य परिस्थितिवर भाष्य करणारे, चर्चेत असलेले, वन संरक्षण या सारख्या वेगवेगळ्या आणि वैविध्यपूर्ण विषयावर आधारीत कथानकांची गुंफ़ण केलेली असते.
राजस्थानातील काही आदिवासी जाती –जमातीत त्यांच्या दैवत समान गुरूंचे चरित्रावर आधारीत कापडाच्या गुंडाळीवर चित्र मलिका रंगवण्याची परंपरा आहे. चित्रमालिकांच्या अनुशंगाने जमातीच्या लोकांसमोर संयुक्तित कथा कधी नाचत,गाणे म्हणत,निवेदनातून सादर करतात.यात चित्र फ़लकावरील चरित्रातील संबंधीत प्रसंगाच्या चित्रावर प्रकाश पाडून निवेदन पुढे नेले जाते.रात्र रात्र चालणाऱ्या या सादरीकरणाला या जमातीत कांहीस धार्मिक अधिष्टान आहे.
कालिघाट चित्रकारी
या शैलित चित्र रंगवणाऱ्या चित्रकाराना “कालिघाट पटुआ” अस म्हणतात. रामायण महाभारतातील कथावर आधारीत चित्रे यात आधुनिकपद्धतीने रंगवलेली असतात. मजेचा भाग म्हणजे या कालीघाट कलाकारानी हिंदू देव देवतांच्या बरोबरीने इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातील पौराणिक कथावर आधारीत चित्र पट्ट्यांचा समावेश करून खरोखर बहुधार्मिक व्यावसायिक क्षेत्र काबिज केल आहे
कालिघाट चित्रकारीतील शैली,रंग,रचना याचा अर्वाचिन बंगाल चित्रशैलीवर परीणाम जाणवतो.यामिनी रॉय,नंदलाल बोस यासारख्य जगप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतीत तो दिसून येतो.
महाराष्ट्रात चित्रकथी या नावाने ही कला ओळखली जाते. कोकणातील ‘ ठक्कर’ छ्त्रपती शिवाजी महाराजांसाठी हेरगिरी च्या कामावर असत असे म्हणतात. त्यांचे वंशज गंगावणे यांनी चित्रकथीची परंपरा जतन केली असून त्यांनी चित्रकथी संग्रहालय , पिंगुली (जि.सिंधुदुर्ग) या गावी “ठक्कर आदिवासी कला अंगण व कला संग्रहालय “ या नावाने उभारले आहे.
जयंत लीलावती रघुनाथ
Comments
Post a Comment