A BRIEF ENCOUNTER -एक छॊटीशी मुलाकात
एक छॊटीशी मुलाकात
-- सिनेमाचे जग म्हणजे सर्वांच्या कुतूहलाचा विषय या दृकश्राव्य माध्यमाने भुरळ
घातले नाही असा माणूस विरळाच या जादुभरी दुनियेत डोकावून पाहायचं, त्याचा अंतरंगाचे दर्शन घेण्याचा मोह सर्वाना पडतोच. बस मधून ,रेल्वेतून प्रवास करत असताना जर कोठे रस्त्याच्या बाजूला ,शेतात एखाद्या शूटिंग चालू असलं, तर, बस ,ट्रेन मधील सारी डोकी-नजरा अगदी ड्रायव्हरसह तिकडे
वळणार्च ; अशा या माध्यमाचा वापर व्यापारी तत्वावर मोठ्या प्रमाणात होणार निश्चितच पण-
साहित्य, चित्रकला, संगीत-नृत्य,शिल्प,-नाट्य जणू सा़ऱ्या चौसष्ट कलांचं एकवटलेल्या या माध्यमाकडे सर्जनशील,सशक्त, कसदार, कलाकृती निर्माण करण्याच एक प्रभावी साधन म्हणून पाहणारेही कमी नाहीत. चित्रपटांच्या या जगात सत्यजीत रे,आकिरा कुरुसोवा,फ़ेलिनी,डिकासा,मायकेल ऍंजेलो ऍटनी ----या सारखे श्रेष्ठ, प्रतिभावंत दिग्दर्श्क आपल्या अजोड कलाकृती,चित्रपट यांच्यामुळे , इतर क्षेत्रातील दिग्गज जसे,लि़ओनार्ड द विन्ची,मायकेल ऍंजेलो,पिकासो,वा शेक्स्पियर,कालिदास किंवा बेथोवेन,तानसेन हे किंवा त्यांच्या सारखे ,असेच पंक्तित बसलेले आहेत.
या दृकश्राव्य माध्यमाचा मानवी मनावर होणारा एकसंघ परिणाम ही या माध्यमाची एक जबरदस्त ताकद आहे.समाज मनावर विशिष्ट मूल्यांच्या संस्कारासाठी, समाजात जागृती आणण्यासाठी, हे एक प्रभावी हत्यार आहे; याची जाणीव असलेले लोक डॉक्युमेंटरी --वृत्तचित्र या प्रकारची फिल्म करण्यात स्वत:ला झोकून देतात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एखाद्या विषयाने झपाटून जाऊन, पैसा, वेळ, श्रम आणि प्रसंगी लोकमताची पर्वा न करता काम करत रहातात.डॉक्युमेंटरी करत राहातात.
एके काळी सर्व चित्रपट गृहात न्यूजरील म्हणून काही सरकारी डॉक्युमेंटरीज दाखवणे सक्तीचे होतं, टाइम कीलर म्हणून दूरदर्शनवरही -अधुन मधुन त्या दाखवल्या जायच्या. दूरदर्शनची एकाधिकारशाही संपली आणि इतर वाहिन्यांवर, पर्यावरण -निसर्ग, विज्ञान किंवा इतिहास या विषयाला वाहिलेल्या सोडता ज्या फक्त त्या विषयासंबंधीच असतात; अस्सल मानवी मूल्याधिष्टीत,समस्याप्रधान वृत्तचित्र सहजासहजी पहायला मिळणे दुरापास्त झालं. व्यापारी (कमर्शियल),समांतर(आर्ट फ़िल्म ),नव सिनेमा इत्यादींच्या महोत्सवांप्रमाणेच डॉक्युमेंटरीचेही महोत्सव होतात पण ते आवर्जून पाहणारेही विरळा आणि पाह म्हणणाऱ्याला मिळणारी संधीही तेवढीच दूर्मिळ.त्यामुळे हिरीरीने या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबद्दल एक कुतुहल मिश्रित, आश्चर्य आणि कौतुक वाटत राहत.पैसा तर फारसा नाहीच पण म्हणून प्रसिद्धीही कमीच.अगदी अचानक या क्षेत्रातल्या एका अशाच व्यस्त, प्रतिभावान जोडप्याचा परिचय होण्याचा लाभ झाला
**
आमच्या विनंतीला होकार देऊन डॉक्टर राणीताई बंग यांनी प्रेमाने ’शोधग्रामला’ कधीही येण्याचे आमंत्रण दिलं आणि तेथे पोहोचताच त्याच जिव्हाळ्याने स्वागत करून चहा-नाश्ता जेवणासह एका स्वतंत्र ’सायली-बोइली’ नावाच्या कॉटेजमध्ये मुक्कामाची छान सोय करून दिली. (वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे--)शोधग्राम मधे सर्व इमारतीना अशीच वृक्षवल्ली ची नावे दिली आहेत.)
रात्री पोहोचल्यामुळे आजूबाजूचा परिसर आणि परिसरवासियांचा काहीच परिचय झाला नव्हता. चहा, जेवण सारे काम मध्यवर्ती मेसमध्ये ’मोहा माऊली’ असे सार्थ नाव असलेल्या एका बैठ्या इमारतीत.
अर्थातच आपण आत्ताच आयुष्यात पहिल्यांदा भेटलो आहोत वगैरेचा कोणताच संकोच न वाटता आमच्या हिंदी, इंग्रजी आणि मराठीत गप्पा सुरू झाल्या. आभा आणि पुनित ही जोडी व त्यांची टीम सर्चच्या ’अंकुर’ या नव्या प्रकल्पावर डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी येथे दाखल झाली होती. त्यांची ’स्वाती व्हिज्युअल्स’ (स्वाती त्यांच्या मुलीचे नाव) नावाची दिल्लीत स्वतःची कंपनी आहे. नऊवारी साडीतील ती बाई म्हणजे या डॉक्युमेंटरीतील हिरॉईन,ती सर्चची कार्यकर्ती-आरोग्यदूत-पण सर्व टीमच्या मोकळ्या वागण्यामुळे असेल तिच्यावर कसलेही दडपण जाणवत नव्हतं.जणू राणीताईंची निवड त्यांच्या इतर कामासारखीच इथेही चोख होती.
त्यांच्या बरोबरची बाकीची मंडळी गडबडीने उठून गेली आणि या दोघांनीही आमचा निरोप घेतला. आम्ही तयार होऊन सर्चच्या ऑफिस कडे चाललो होतो; तर समोर जरा घोळका आणि गडबड दिसली.तर ऑफ़ीसच्या शेजारच्या झाडाखाली एक आदिवासी बाई, एका लहान मुलाला वारंवार जेवण भरवत होती. कॅमेरा लावला होता. सारे युनिट ’शूटिंग’च्या कामात गुंतलं होत.त्या छोट्याशा शॉटसाठी आभा व पुनित दोघांची चर्चा चालू होती आणि रिटेक चालले होते.शूटिंग म्हटल्यावर पाय थबकलेच.
भेटी व्हायया त्या चहाच्या वेळी किंवा जेवणाच्या वेळी; विशेषत: रात्री.
कारण तेही डबा घेऊन जात असत व आम्हीही.दिवसा आम्ही सर्वजण खेड्यात
जात असूव तेही शूटिंगसाठी आजूबाजूच्या खेड्यात जात.
"जयंतजी-वैसो तो कॅमेरीकी करामतसे हम कुछ् बना सकते है। इथे त्यांनी काही टेक्निकल श्ब्द वापरले ’पण मला ते पटत नाही मी स्वतःला एक 'Issue Based 'डॉक्युमेंट्री निर्माता म्हणवून घेतो आणि अशा प्रकारची गिमिक करणे मला मान्य नाही"
तुम्हाला माहित आहेच की "अंकुर "हा प्रकल्प नवजात
बालकासाठी आहे. आणि त्यात कोणतही कॉम्प्रमाईज करणे आम्हाला पसंत नाही.- प्रश्न कॉम्प्रमाईज
करायचा नाहीच आहे ते करणार नाहीच.
’But we are hard pressed for time!’ आम्हाला कोणत्याही
परिस्थितीत हे काम आठ दिवसात संपवायलाच हवं. शिवाय मुंबईच्या बुजूर्ग अभिनेत्रींचा
यातला सहभाग, त्यांच शूटिंग दोन दिवसात संपवून त्याना रिकाम करायच
आहे.”
गप्पांच्या ओघातया दोघांची स्वतंत्र वृत्ती,कामाशी, विषयाशी असलेली बांधिलकी आणि वेगळेपण
जाणवत राहायच.
**
दोघांनी शूटिंग बघायला कधीही येण्याचा आमंत्रण दिल असल तरी जमत
नव्हतं.
२६ जानेवारीमुळे सुटीचा मूड होता ’सर्च’मधल झेंडावंदन झाल्यावर,ज्याना शूतिंग पहायच आहे , त्या सर्वांना राणीताईनी आपल्याबरोबर घेतले. आभा,पुनित मी आणि इतर दोन असे एका सूमोतून पुढे गेलो. खेड्यातील एका मातीच्या विटांच बैठ घर. त्या घरात हे शूटिंग.
प्रसंग असा एक पहिलट करीण" तिची ओटी भरण्याचा समारंभ "आणि दाई तिला"प्रिन्यॅटल के़अर व पोस्ट न्यॅटल केअ़र कॉशन"(Prenatal care and Postnatal care caution) बद्दल समजावून सांगते आहे.
शूटिंग म्हटल्यावर पन्नास-साठ बायामाणस, पोरांचा घोळका
आवाज, गलका चालू -दारातच गोठा. जनावरे बाहेर नेऊन बांधलेली पण भिंतीला लागून शेजाऱ्यांची गोठ्यातच-बाजुला लागून बोअरचा हातपंप,- त्याच्या मागे जवळच उकी़रडा इ.इ.-अशी बाहेरची परिस्थिती.
दिना पाठक म्हणजे एक बुजुर्ग अभिनेत्री त्यांच काम असल्यामुळे
आभा -पुनित टेन्स. शिवाय हिंदी व मराठी अशी दोनही भाषेत फ़िल्म करायची आणि डबिंग सिस्टिमला
दोघांचाही विरोध.
नॅचरल वॉ़ईस ,इट्स इफ़ेक्ट अशा व इतर अनेक तांत्रिक शब्दात त्यानी मला समजावल.
सुमारे दहा बाय बाराच्या खोली पुनितच्या डोक्यापासून वीतभर उंचीवर छप्पर.आत प्रसंगाच्या हिरौइनसह ८/१० बायका दाटीवाटीने बसलेल्या- एका गोदरेजच्या खुर्चीवर ’नायिका’ आणि मागच्या पेट्याऱ्यावर ’दाई’ आपल्या फ़िल्मच्या सूत्रधार -दिना पाठक. भिंतिला जेवढे चिकटता येइल तेवढे चिकटून, काही जण बाकावर- मी जेवढ आकसून घेता येईल तेवढ आकसून डाव्या कोपऱ्यात समेटलेला. माझ्यापुढे ’लाईटच्या ट्रापॉईडच्या पल्याड ’स्क्रिप्ट प्रॉम्टर’-चिमटून बसलेली- उजव्या कोपऱ्यात कॅमेराचा ट्रायपॉड व कॅमेरामन,आभा-पुनित.
सुमारे दोन तीन मिनिटांचा त्या शॉटला पंचवीस मिनिटे लागली.
आभाने प्रसंग समजावून सांगितला. दीदीनी त्यांच्या संवादाचीद्या रिहर्सल केली. ’ओके’ -ठीक -’सायलेन्स’ ’कॅमेरा रोल ऑन; ’ॲक्शन’ म्हटले की "बसलेल्या बायका कॅमेऱ्याकडे पाहायचा, प्रसंगाची नायिका (अति)गंभीर व्हायची किंवा खाली बघायची-तर ओटी भरणारी तिला झाकोळून टाकायची-तर दिदींचा संवाद चुकायचा.मग आभा पुन: समजावयाची; शांतपणे सारं पहिल्यापासून.
आपण वाचतो किंवा कधीतरी ऐकलेलेअसते की या क्षेत्रातली कसलेली,रूळलेली मंडळीसुद्धा कसा वैताग आणतात,देतात.रिटेक
वर रिटेक.या सर्वावर कडी म्हणजे तर मागच्या गोठ्यातल्या म्हशीच्या हंबरण्याने सर्व
छान झालेला शॉट पुन्हा घ्यावा लागला. पण न कंटाळता,न वैतागता
आभा आणि पुनित नी ’पहिलटकरिणीच’ ते खास गरोदरपणाच तेज आणि हास्य कॅमेरात पकडल.
26 व्या मिनिटाला मी दोघांचे अभिनंदन केलं आणि आभार
मानून खोली बाहेर आलो. पाठीला चिकटलेला शर्ट मोकळा केला.
**
आभाच्या
वडिलांनी खेड्यातील,
ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा देण्याच्या ध्येयाने आग्र्या जवळील खेड्यात आपली प्रॅक्टीस सुरु केली.आभाच्या आईलाही
त्यांनी शिकायला लावून आर.एम.पी. केलं. घरात एकदम मोकळे वातावरण, मुलगा-मुलगी असा विचार डोक्यात नाही. त्यामुळे असेल कदाचित आभा एकदम स्वतंत्र
वृत्तीची. आभाने डॉक्टर व्हाव ही वडिलांची इच्छा तर निदान रिसर्च करून डॉक्टरेट तरी
मिळवावी ही आईची ईच्छा-म्हणजे काय तर नावामागे डॉक्टर असावे असं त्यांना वाटायचं. यातून
मग आभा विज्ञान शाखेकडे वळली असावी.पण आभाचा
ओढा वाचण्याकडे,कला,साहित्य याकडे.
असमानता, स्त्री-पुरुष भेदभाव, स्त्रियांचे प्रश्न आणि एकंदरीतच समाजातील विषमता यांची जाणीव तिच्यावरील मार्क्सवादाच्या प्रभावामुळे अधिकच सजग झाली होती. तिच्यातील प्र्तिभावंत तिला अस्वस्थ करत होता,सृजनता गप्प बसू देत नव्हती.आपल्या, भावना, विचार, आदर्श व्यक्त करायला तिच मन धडपडत होत; कलाकार तळमळत होता.
एम. एस. सी. च्या निमित्ताने आभा दिल्लीत आली गंमत म्हणजे तिने झूलॉजी मध्ये एम.एस.सी. केलं आणि स्पेशल सब्जेक्ट काय तर ’स्नेक्स’.(साप)
दिल्लीतील सृजनतेच जग तिला खुणावत होतं. एन. सी. आर. टी. मधील
नोकरीतून मिळणारा पुस्तकाच्या जगाच्या अल्पशा आनंदात असताना तिच्यावर साहित्यातील दीपस्तंभाचा
कवडसा पडला.अमृताजींच्या स्नेहल परिचय होण्याचा योग आला. त्यानी हीची मुलाखत घेण्याचा
आणि इमरोजनी त्यासाठी आभाचे रेखाटन करण्याचा
हा दुर्मिळ योग हे तिच भाग्यच.
या प्रेमातून आभाला अमृतांच्या कथांचे हिंदीत भाषांतर करण्याची
संधी मिळाली. या सारख्या अनुभवाचा तिला तिच्या पुढच्या प्रवासासाठी
निश्चित खूपच फायदा झाला. दिल्लीतील प्रतिभावंतांच्या वर्तुळात आता तिचा वावर वाढला.
मुझ्झफ़र अली यांच्या विभक्त पत्नी सुहासिनी अली ज्यांचे नाव मुख्यत: समस्याप्रधान वृत्तचित्र निर्मात्या म्हणून
प्रसिद्ध आहे;त्यांच्याशी मृणाल पांडॆ यानी ,आभाची ओळख करून दिली.
आभाला त्यांनी ब्रेक दिला. ’स्त्रियांच्या प्रश्ना’वरील डॉक्युमेंटरीसाठी त्यांनी आभावर
पटकथा लेखनाचे काम सोपवले.आभाने त्यांच्याबरोबर ’मन चंगा बिडी’ साठी मदतनीस म्हणून
काम केलं व त्याची पटकथाही लिहीली. मध्यप्रदेशातील चंदेरी येथील ’स्त्री बिडी’ कामगारांच्या
हलाखीच्या परिस्थितीवर ही डॉक्युमेंट्री होती. दरम्यानच्या काळात या अतिसंवेदनशील तरुणीचे
प्रिंट माध्यमातल्या एका सहकाऱ्यांबरोबर प्रेमाचे संबंध जुळून आले आणि तिने चक्क त्याच्याशी
विवाहही केला; पण हा संसार दुःखाचा, क्लेशकारक
इतका की आभाने नवर्यापासून दूर जाण्याचा,एकटे राहण्याचा निर्णय
घेतला व कायदेशीर घटस्फोटाशिवाय त्याच्यापासून वेगळी झाली.
वेगळ व्हायचा निर्णय
घेतला तरी आभा भावनिकदृष्ट्या त्याच्यात इतकी गुंतली होती की तिला कमालीच्या नैराश्याने
घेरले. अशा तीव्र मानसिक आवर्तात असताना तिला पुनित टंडन भेटला
**
खास लखनवी अंदाज, पहिले आप वाली नम्र आदाकारी आणि असली घीमे मिसरी घोळल्यासारखी मिठी जबान. मध्यमवर्गीय, सुखवस्तू कुटुंबातला, सुखवस्तू पण’चळवळ्या’,मार्क्सवादाचा भक्त पुनित टंडन; "पॉलिटिकल सायन्स" या विषयात लखनौ युनिव्हर्सिटीतून एम.ए. केल्यावर,जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत" माध्यमांची राजकारणातील भूमिका" (Roles of Press/Communication in Politics) यात रिसर्च करायला दिल्लीत दाखल झाला होता. कॉलेजच्या काळात ’छात्रयुवासेने’त सक्रिय असलेल्या पुनितने, सुभाषचंद्र जयंतीला (23 जानेवारी) होणारी वक्तृत्व स्पर्धा सतत पाच वर्षे जिंकली होती. या काळातच त्याला लखनऊ टीव्हीवर "युवा" कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायची संधी मिळाली.
दिल्लीत आल्यावर, प्रथम ’माया’ मासिकात व नंतर ’जनसत्ता’ मध्ये मुख्य वार्ताहारी करत करत तो टीव्हीच्या जगात पोहोचला. खाजगी वाहिन्या या काळात सुरू झाल्या होत्या.धीरूभाई अंबानी यानी "ऑबज्र्व्हर न्यूज" नावाचे चॅनेल सुरू करून त्याच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी विनोद दुवां च्यावर सोपवली होती,पुनित दुवांच्या गोटात सामिल झाला.
याच
सुमारास त्याच्या जीवनात व्यवसायाच्या निमित्ताने आभा आली. दोघांनी बिर्ला यांच्या
’हिंदुस्तान टाइम्स’ टीव्हीसाठी एकत्र काम करण्यास सुरुवात
केली व पहिली "स्पास्टिक चिल्ड्रेन" ही फ़िल्म फक्त तीन दिवसात तयार केली.
दोघांचे सूर जमत गेले. दोघे पक्के मार्क्सवादी आणि अगदी धार्मिकतेच्या भावनेने मार्क्सवादाचा
पुरस्कार करत असले, तरी पक्ष सदस्य किंवा कम्युनिस्ट पक्षाचे
कार्ड होल्डर झाले नाहीत.
एव्हाना दोघे एकत्र राहायला लागले होते. दोघांनी या क्षेत्रातच करियर करायचं निश्चत केलं आणि आपल्या मुलीच्या नावाने स्वतःची "स्वाति व्हिज्युलस" ही कंपनी सुरू केली.
या बॅनरखाली त्यांनी दिल्लीच्या "सेंटर फॉर व्यूमेन डेव्हलपमेंट" या संस्थेसाठी तयार केलेली डॉक्युमेंट्री फिल्म"Voices Of Women" ब्राझील येथील रियो दि जानेरो येथे भरलेल्या ’वल्ड अर्थ समिट’मध्ये दाखवली गेली.
स्त्रीवादी, जेंडर
बायस, लिंगभेद यावर आधारित असमानतेच्या विरोधात आवाज उठवणारी
आभा 1995 साली व्हॅनोवर जर्मनी
येथील युनिव्हर्सिटी ऑफ व्युमेन येथे तीन महिन्यासाठी अभ्यासाकरिता जाऊन राहिली होती.
आभाने कथा, पटकथा, दिग्दर्शन व निर्माता
म्हणून तयार केलेल्या साऱ्या डॉक्युमेंटरीज
या वेश्यांवर, स्त्रीयांच्या
दलालीवर, अल्पवयीन मुलींच्या बाजारावर, मजुर स्त्रीयांच्या हलाखी वर आधारलेल्या, स्त्रीयांवरील
अत्याचारावर झोत टाकणाऱ्या आहेत. डिसेंबर 2000 पासून आभाने ’जागोरि’या
संस्थेसाठी काम करायला सुरुवात केली.
**
या जोडीची वैयक्तिक मतें, स्वप्नं आणि महत्वकांक्षा मात्र, एकदमच त्यांच्ं टोकेरी व्यक्तीमत्त्व अधोरेखित करणार्या आहेत.आभा स्वतःच्या कामावर खूश नाही, समाधानी तर अजिबात नाही. दुसऱ्यासाठी फिल्म करणे हे तिला क्लेशदायक वाटतं; एक प्रकारची पैसे मिळवण्यासाठीची तडजोड वाटते.Comprimiseवाटते. पुनित बरोबर एकत्र काम करताना आपल्या सर्जनशीलतेवर(Creativity)वर, निर्मिती वर बंधने येतात असं वाटत राहतं. तिची एक तीव्र इच्छ -महत्त्वाकांक्षा आहे (हीच एक किंवा अंतिम इच्छा असच पण नाही)की, ती, कधी ना कधी आणि लवकरात लवकर स्वतंत्रपणे Sxuality in Women या विषयावर डॉक्युमेंटरी फिल्म करायची.
पुनितचा सहनिर्मितीवर Collective Creativity या संकल्पनेवर विश्वास आहे.यासाठी तो "खजुरहो"," महाबलीपुरम" आदी समूहशिल्प निर्मितीची उदाहरणे देतो.हा एक दोघांच्यातला कधीही न मिटणारा वाद आहे. त्याला स्वतःला "इश्यूबेसड" ज्वलंत प्रश्नांवर- समस्याप्रधान डॉक्युमेंटरीज तयार करायला आवडते. तो स्वतःला "इश्यूबेसड" डॉक्युमेंटरी निर्माता म्हणून घेतो. त्याला आता कसलीच महत्त्वाकांक्षा नाही; कोणतेही स्वप्न नाही; त्याला या व्यवसायाव्यतिरीक्त अन्य कोणत्याच विषयात रस नाही.आरामात पडून राहावं आणि भरपूर वाचन करावे.
दोघांच्या वर मार्क्सवादाचा जबरदस्त ,प्रभाव अगदी अंधश्रद्धा म्हणण्य़ा इतका.चीन मधिल विद्यार्थ्यांच्या
निषेध मोर्चा वरील गोळीबाराची घटना आणि त्यानंतर सोव्हिएट रशियाचे झालेले विघटन या
घटनानी त्यांच्या मार्क्सवादी स्वप्नांचा भ्रमनिरास झाला. आपले विचार ,आपले विश्वास, आपले आदर्श पुन्हा तपासून बघावेत असे वाटायला
लागले. आपली संस्कृती, परंपरा, मूल्य आणि
इतिहास समजून घेण्यासाठी त्याने भारतीय साहित्य, तत्त्वज्ञान
यांच अभ्यासू वृत्तीने भरपूर वचन केल. असं असलं तरी दोघांच्या वर असलेल्या मार्क्सवादाचा
खोल प्रभावामुळे त्यांची काही मत,विश्वास दृढ आहेत.असमानता,
विषमता, स्त्रियांना मिळणारी समाजातील स्त्री-पुरुष
भेदभावार आधारित वागणूक यांचा तर ते निषेधच करत आले आहेत. त्यांचा देव आणि लग्न या
संस्थांवर विश्वास नाही. "आमचा दोघांचा एकमेकांवर दृढ विश्वास आहे,गाढ प्रेम आहे. आम्हाला या आमच्या नात्याला -कायदेशीर करण्यासाठी लग्नाचे अधीकृत बिरूद लावायची गरज वाटत नाही "
***
आमच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या मोकळ्या उत्तरांमुळे आमच्या
गप्पा छानशा रंगल्या. दिल्लीला येण्याच आणि त्यांच्या घरीच उतरायचं त्यानी आमंत्रण
दिल. आमच्याकडे पण जरुर याच आभालाला फिल्मइन्स्टीट्युट मधील फिल्म एप्रिसिएशन चा कोर्स
करायची इच्छा आहे तर ती माहिती कळवतो, तेव्हा
तुम्ही दोघेहीआमच्याकडे या आणि फोन नंबरची, पत्त्यांची देवाणघेवाण
करून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. त्यांची दिल्लीची ट्रेन मध्यरात्री असल्याने अगदी
निघताना बाय करता आलं नाही; तरी परत आल्यावर लगेचच त्यांना ई-मेल
केली. "गुजरातमधील दंगलींमुळे प्रचंड अस्वस्थ झालो आहोत. हे काय चालले आहे कळत
नाही. आपण काहीतरी काहीतरी करायला पाहिजे "अशा अर्थाचे त्यांचे उतर आले. त्यानंतरच्या
ई-मेलला प्रतिसाद नाही. दोघांची काहीच वार्ता नाही
***
नुकतेच या एप्रिलमध्ये शोधग्रामला गेलो असताना या फिल्मचा विषय
निघाला आणि त्याबरोबर आभा -पुनितचा.आम्ही म्हणालो
"या जोडीचा काय पत्ता?आमच्या
पहिला ईमेलला लगेचच उत्तर आल. नंतरच्या मेलला उत्तरच नाही" आणि डॉ.राणीताईनी सांगितलेल्या
हकिकतीने सुन्न व्हायला झालं.
हैदराबादला हे दोघे ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्याच्या शेजारील
शोभेच्या दारूच्या गोडाऊनला आग लागली. त्याचा धूर लॉजवर आला व हे दोघे त्या धुरात गूदमरून
गेले.कळले तेव्हा फार वेळ झाला होता; दोघेही मदतिच्या पार पोहोचले होते.या अपघाताची हकिकत डॉ,अभय बंग यानाअशीच अचानक कळली.हैदराबादच्या विमानात त्यांना टाइम्स ऑफ इंडियामध्ये
ही बातमी दिसली. इतक्या दिवसाच्या या गूढ संपर्क विहीनंतेच रहस्य असे विदारक आणि शोककारक
निघालं.
***
सर्चनेच पुढाकार घेऊन
पोस्टप्रॉडक्शननचे सारे सोपस्कार करून ’फिल्म’ पूर्ण केली.
" नन्हीसी जान "
गडचिरोली ( महाराष्ट्र) जिला के 39 गावोंमें
’सर्चद्वारा चलाए जा रहे प्रयोग पर ’आधारित:
अभिनय-
पार्श्वस्वर : -दिना पाठक
निर्माता
:-पुनित टंडण
निर्देशन
व पटकथा:-आभा दयल
संकल्पना,तक्निकी
एवं पटकथा मार्गदर्शन:- डॉ .अभय बंग
पटकथा
सहयोग :-समिधा वर्मा रस्तोगी
कॅमेरा
:- राजेंद्रकुमार
गीत:-आभा
दयाल
संपादन:-
पुनित टंडन
अतिरिक्त
संपादन:-अभिक चटर्जी-अनुराग कुलकर्णी
पोस्ट
प्रॉडक्श्नन:-स्वाती स्टुडिओ
ग्राफिक्स
:-आर के स्टुडिओ
आर्थिक
सहायता:- स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
आभार
::सर्च,
दाइ और आरोग्य दूत
सर्चने
या सीडीचे प्रकाशन ’स्वाती टंडन’च्या हस्ते दिल्लीत करून आभा आणि पुनित यांची स्मृती
जागवण्याच औचित्य साधलं. या फिल्ममधील मध्यवर्ती सूत्रधार- ’दाई ’दिना
पाठक’ याही काळाच्या आड गेल्या व ’आभा-पुनितही’
त्यांची आठवण म्हणून;
ही फिल्म स्मृती अर्पण :
दिना पाठक
आभा दयाल
पुनित टंडन
----- जयंत
लीलावती रघुनाथ.
’मिळुन साऱ्याजणी’ जानेवारी २००८ मधून
Comments
Post a Comment