NOSTALGIA -सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे --3
नॉस्टालजिया -सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे
एकांकिकीकेत भाग घेतलेल्या-कर्मचाऱ्यांची नावे बदलली आहेत.
-----तिसरा दिवस आणि समारोप-
स्पर्धेच्या शेवटच्या ३ ऱ्या दिवशी तीन एकांकिका बरोबरच स्पर्धेचा निकाल असा भरगच्च कार्यक्रम होता.
पुणे विभागातर्फ़े "ब्रिफ़केस"लातुरकरांची "उत्तर रात्र" आणि दक्षिण महराष्ट्र झोन म्हणजे घरचा "मनपक्षी" या क्रमाने सादर झाल्या.
दोन दिवसांच्या सहा एकांकिकांच्या परिणामावर उतारा म्हणून की काय पण योगायोगाने एकच एकांकिका पक्षी कथानक असलेल्या ’ब्रिफ़केस’ आणि ’उत्तर रात्र’ या वेगळ्या नावाने वेगळ्या संचात सादर झाल्या.
पत्रकाराच्या खूनाला अपघाताने साक्षीदार झालेल्या एका पूर्वाश्रमीच्या चोराला त्या पत्रकाराची बॅग सापडते. आणि त्यामुळे त्या बॅगेतील कागदपत्रांच्यासाठी ज्या लोकांनी त्या पत्रकाराचा खून घडवून आणला ते लोक त्या चोराच्या मागे लागतात. आश्रयासाठी तो एका न्यायाधीशाच्या घरात घुसतो, त्यांना पोलिसांना बोलवण्याची विनंती करतो आणि आपल्या पूर्वाश्रमिच्या कथा सांगून पटवून देतो की त्याला पकडले पाहिजे. निव्वळ तीन पात्रे आणि पैकी पत्रकार किंवा शेजारी असे अगदी कमी महत्त्वाचे एक पात्र असलेल्या या एकांकिकेत प्रेक्षकांना बांधून ठेवण्या इतपत रहस्य जरी नसले तरी मसाला भरपूर होतात. पुणेकरांच नेपथ्य भरगच्च होतं आणि जज्ज ही वयस्कर आणि परिपक्व दिसत होते. त्यांनी न्यायाधीशांच् गांभीर्य व समतोल वृत्ती चांगली दाखवली. पण अजूनही नाईट गाऊन घालायची हौस काय कमी झाली नसल्याने ते गा़ऊनच्या खिशात हात घालायचा प्रयत्न करत होते आणि त्याला ईस्त्री नसल्याने तो सटकत होता. चोर म्हटले की तो अर्धवट दाढी वाढलेला,गळ्यात रूमाल आणि पट्ट्या पट्ट्याचा टी-शर्ट किंवा भडक कपडे घातलेला असला पाहिजे ही हिंदी सिनेमामुळे आपल्या डोळ्यात फिट्ट बसलेली प्रतिमा दोन्ही एकांकिकांच्या दिग्ददर्शकानी तंतोतंत पाळली."ब्रिफ़केस" मधील चोर फारच सोफिस्टिकेटेड वाटत होता. तर उत्तर रात्र मधील चोर मात्र बेरकी,-आयुष्यभर फ़ाका मारलेला पण आतून साऱ्या परिस्थितीवर चिडलेला,जे एकांकिकेच्या लेखकाला अपेक्षित होता तसा जाणवला.उत्तररात्रमध्ये शेजारी खिडकितून बोलतो यासाठी चक्क एक खिडकीच उचलून स्टेजवर आणायची कल्पना मजेशीर होती.
दोन्ही एकांकिका या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद होत्या.त्यामुळेच पुणेकरांनी ती स्वतंत्र लिखित असल्याचा दावा केला होता आणि स्वतंत्र लेखनाच्या पारितोषकावरही आपला हक्क पोचतो असा त्यांचा समज लातुरकरानी ’सेंसार बोर्डा’च सर्टिफ़िकेट दाखवून तेथेच संपवला.तथापी जाताना पुणेकर "ब्रिफ़केस"मध्ये दुसऱ्या क्रमांकाच पारितोषिक कधी आणि कसे घे़ऊन गेले ते कळाल नाहीच.
कोल्हापूर येथून आणि घरचीच असल्याने अधिक अपेक्षेने सामोऱ्या गेलेल्या "मनपक्षी"ने अपेक्षा भंग केला. मुळातूनच रंगमंचावर प्रेक्षकांकडे पाय करून झोपलेले दोन रुग्ण आणि त्यांच्या संवादातून कळणाऱ्या त्यांच्या पूर्व आयुष्यातील घटना हा प्रकार सुसह्य करणे ही फारच अवघड गोष्ट होती. नेपथ्य, प्रकाश योजनेबरोबरच संवादाची फ़ेक, यथोचित मुद्रा अभिनय या साऱ्या इतक्या गोष्टींची मागणी करणारी ही एकांकिका दिग्दर्शनासाठी एक जबरदस्त आव्हान होते. कोणाच्या अभिनयाची नक्कल करण्यामुळे अस्सलपण येत नाही. आकाशा नंदाची भूमिका करणारे तर हळवे भावूक वाटायच्या ऐवजी चक्क ज्ञानदीपचे आकाशानंद वाटत होते.
श्री,महेश कोठारे यानी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात या संस्थेतून रंगभुमी आणि चित्रपट्सृष्टीला चांगले अभिनेते मिळाले आहेत याचा आवर्जुन उल्लेख केला होता.बंगलोरूचा अपवाद वगळता एकंदरीत सर्वच एकांकिकांचा स्तर चांगला होता आणि केवळ हौस म्हणून नव्हे तर कांहिश्या झपाटल्याप्रमाणे,बांधिलकीने त्या सादर झाल्याने एक सुखद गोड धक्का बसला; व श्री कोठारे यांच्या विधानाची पोच मिळाली.
संस्थेच्या वरीष्ठ ,क्षेत्रीय आणि सहाय्यक महा प्रबंधनकांच्या उपस्थितीत आणि हस्ते पारितोषिक वितरण सोहळा व समारोपाचा कार्यकम परीक्षकांचे आभार मानून यथोचित पार पडला.
जयंत लीलावती रघुनाथ.
Comments
Post a Comment