VRS AND AFTER-स्वेच्छा निवृत्ती आणि नंतर(2001)



 स्वेच्छा निवृत्ती आणि नंतर

आधी मी जेव्हा प्रत्यक्ष नोकरीतून मुक्त झालो, त्या सुरुवातीच्या काळात जर मला कोणी विचारलं की, आता कसं वाटतंय? तर मी सांगायचो I am reveling , मजेत आनंदान हा मोकळेपणा उपभोगतो आहे. आजही माझ्यात तोच आनंद भरून राहिलाआहे .आय एम रिव्हेलिंग.
हा निर्णय मी जाणून समजून विचार करून घेतला. प्रत्यक्षात हा विचार  मी, ही स्वेच्छा निवृती घेण्याबाबतचा नियम अमलात आला,तेव्हापासूनच करून ठेवला होता.
जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि त्याचे तातडीचे परिणाम यातून आलेली स्वेच्छा निवृत्तीची संधी हा केवळ एक सुंदर योगायोग होय.
 शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं, घर असला सुखी संसार असे टप्पे पार करत करत निवृत्तीकडे वाटचाल करायची- तशी ती होतच असते म्हणा, की आपण काही वेगळी वाटचाल करायची रसिकतेत हे एकदाच मिळालेला आयुष्य जीवनाचा आस्वाद घेत घेत, त्या अंतिम अटळ क्षणाकडे प्रस्थान करायचं, या विचाराचा भुंगा मनात कायम आहे. माझ्या स्वेच्छानिवृत्तीच्या मागचे सर्वात प्रबळ कारण हे आहे.
आर्थिक जबाबदारीसाठी अर्थाजन ही अटळ गोष्ट बनते. स्वतःच्या, प्रियजनांच्या भौतिक आणि मानसिक सुख समाधानासाठी नोकरी व्यवसायाचे ज्यू मानेवर बसते ते जवळ जवळ आयुष्यभर! मुलगा असो वा मुलगी -ती एकदा  ३-४थ्या वर्षी  बालवाडीत गेली की  कशात ना कशात गुंतत पार साठी पर्यंत अडकून पडते.
या संधीने, पहिला आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न  म्हणजे आर्थिक स्थैर्याचा ,तो पूर्णांशाने नसला तरी खूपसा सुसह्य (Manageable) झाला. कौटुंबिक जबाबदारीतील मुलांचा प्रश्न ती मोठी आणि शहाणी झाल्याने हलका झाला.
मी पत्करलेली नोकरी ही पूर्णपणे माझ्या स्वभावाशी विसंगत होती. साहित्य, नाटक, चित्रपट, चित्रकला, त्यातले नवे प्रवाह, समीक्षा, सामाजिक बदल; अशा विविध विषयात मनापासून रस असलेल्या मला ही नोकरी म्ह्णजे एक रूक्ष मरू भुमी वाटायची,"व्यसनेशु सख्यंम" शोध घेण्याचे प्रयत्न अधुरे राहीले.
 माझा "Cog in the Machine "या कल्पनेवर पूर्ण विश्वास आहे. समाजाच्या -देशाच्या  अवाढव्य चक्राचा प्रत्येक जण एक छोटासा खिळा आहे. प्रत्येकाने आपले काम, कर्तव्यं चोख केली तरच हा गाडा (हे चक्र ) व्यवस्थित चालणार आहे. नोकरीच्या काळात माझ्यावर आलेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा, मी माझ्या परीने प्रयत्न केला. बदलीच्या निमित्ताने मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाता आलं. तिथले लोकजीवन जवळून पाहता आले. हातात असलेल्या अधिकाराचा उपयोग करून फ़ुल न फ़ुलाचे पाकाळी  एवढे का होइना त्यांच्या साठी करता आलं. संस्थेच्या या ऋणातून मला मुक्त व्हायचं नाही.
जॉब सॅटीसफ़ॅक्शन  मला कधीच मिळालं नाही. त्यामुळे बढती, पदोन्नती, बदली असले हिशोबही मांडले नाहीत. तसेच या क्षेत्रात करिअर करायचा विचारही केला नाही. केलेल्या कामाचे फळ मला आपोआप मिळत गेले आता आणखी थांबून उरलेली वर्षे परत यात घालवायचे नाही हे नक्की होतं.
 निवृत्ती नंतर मिळालेला वेळ’ हा रिकामा वेळ’ तो घालवायचा कसा? हा साऱ्याच निवृत्ती धारकांचा कळिचा प्रश्न. आपल्या सततच्या बाहेर असण्याची घरच्यांना झालेली सवय, आपल्या सततच्या उपस्थितीने त्यांना अडचणीची वाटायला लागते. ’असून अडचण नसून खोळंबा’ ही अशी अवस्था त्या जीवाला प्राप्त होते. शिवाय रिकाम्या मनाला नाही नाही त्या गोष्टी दिसायला लागतात. घरातल्या माणसांचे मत बळकट करणाऱ्या कृती कळत नकळत घडत राहतात. मग ते या वर्तनाचे वेगवेगळे अर्थ लावतात. कोणी म्हणते ’ रिकामा वेळ’ कोणी म्हणते ’रिकामे मन” पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे ’ऑफिसात साहेब होते, लोक ऐकायचे, त्याची सवय!आता अधिकार नाही म्हणून असलं हे वागणं !’ हा सगळ्यात लाडका निष्कर्ष. सर्वसामान्यपणे सर्वांनाच लागू होणारे, मान्य होणार हे विश्लेषण असलं, तरी कोणत्याही क्षेत्रातून निवृत्त होणाऱ्या व्यक्तीची (कष्टकरी-श्रमिक सोडून) होणारी ’बौद्धिक’ उपासमार त्याला सर्वात जास्त अस्वस्थ करते. व्यवसायात /नोकरीत दररोज येणारी आव्हाने, प्रश्न त्याला एक प्रकारचे ऊर्जा देत असतात. बटन बंद केल्यावर झटक्यात दिवा बंद व्हावा तसा हा ऊर्जा स्रोत पटकन त्या क्षणी त्या दिवशी बंद होऊन जातो. जागेचा मान मरताब, इत्यादी   गोष्टीतून माणूस लवकर सावरू शकतो. हा आदर, हा मान, हा खुर्चीचा आहे, आपला नाही ही समजही खूप जणाना असते.. पण ऊर्जा स्त्रोताची कुंठता त्याच्या लवकर ध्यानात येत नाही. इतरांच्या तर नाहीच नाही. त्याच्या प्रत्येक कृतीचा विपरीत अर्थ होऊन, आपण कोणालाच हवेचे नाही आहोत. मुलं बायकोवर एक नसती जवाबदारी होऊन राहिलो आहोत. अशा निराशामय अवस्थेकडे त्याची वाटचाल सुरू होते. म्हणूनच नोकरी/ व्यवसायातून निवृत्ती म्हणजे आयुष्यापासून निवृत्ती नव्हे , एकदाच मिळणारे आयुष्य ,आता स्वतःसाठी जगायचं, स्वेच्छानिवॄत्तिन उमेदीच्या वर्षांचा दिलेला बोनस कारणी लावायचा ,नोकरीचा वाचलेला (रिकामा वेळ नव्हे) एक सुवर्णसंधी म्हणून !
आजवर धावपळीत, बदली बढतीच्या पळापळीत जे छंद जोपासता आले नाहीत, ज्या आवडी पूर्ण करता आल्या नाहित  त्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायचा.
या साऱ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर गणिती हिशोबाने,आर्थिक संकल्पनांच्या ताळ्याने ठोकळ अंदाजाने  व कुटुंबियांच्या  सहर्ष होकाराने मी स्वेच्छा निवृती घॆण्याची निश्चित केलेली वेळ आणि संस्थ्येकडून सर्व इच्छूकांना  आलेली ऑफ़र  याचा समासमा सयोग झाला. मला हवी होती तेव्हाच नोकरीतून सन्मानाने मुक्तता मिळाली. शिवाय नोकरीची ६-७ वर्षे शिल्लक असली तरी पुन्हा केवळ अर्थाजनासाठी कोणतेही नवीन काम स्वीकारण्याचे नाही हे अगदी नक्की होतं.

 तेंव्हाचे आता-२००३ सालचे

 मी ज्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो, सर्वसामान्यपणे या पिढीने स्वतःकडे कधी सहजपणे पाहिलेच नाही. बदल्याच्या धारेत अडकलेली ,त्या बरोबर वाहणारी किंवा गुदमरलेली क्वचितच तिची  स्पंदन जाणून घेणारी,खूपषी गोंधळलेली आणि   त्यामुळेही असेल कदाचित आत्मकेंद्रित झालेली, मी, माझी बायको, माझी मुलं, बढती, घर, गाडी, मुलांचे शिक्षण, मुलींची लग्न. ऑफिस- नोकरी. घर- कुटुंब या भोवती फिरणारी, काहींशी ’सिनिक’! नव्या कडे संशयानं पाहणारी , जुन्यावर टीका करणारी, बदलांचा उपरोध करणारी, मुक्त अर्थव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान यांच्या झंजावाताने हेलपाटून गेलेली, स्पर्धा, अतिव व्यक्तिवाद,चंगळवाद याच्या सांस्कृतिक आक्रमणाने चक्रावून गेलेली. मनातून या साऱ्या गोष्टीबद्दल कमालीचे कुतुहल आणि आकर्षण पण आजवर जपलेल्या म्हणा किंवा संस्काराने नकळत मानलेल्या मूल्यांच्या ओढाताणीत  अडकून गांगरलेली, हे वास्तव ! मीही  याचाच एक घटक पण सुदैवाने चक्रात न सापडलेला शांत,स्वस्थ राहयचा माझा प्रयत्न म्हणजे माझा आत्ताचा आयुष्य्क्रम.
 उद्या सकाळी धावत पळत ऑफिस गाठायचं नाही आहे. निवांत झोपायचं या विचारातच झोप उडून गेली. 30 32 वर्षे केलेली धावपळ आता आराम करायचा, मनासारखं वागायचं .जणू कॉलेजची शेवटची परीक्षा संपल्यावर मिळालेली मोठी सुट्टीच. अगदी सारा सारा विचार केला आहे. असं करायचं तसं करायचं वगैरे ठरवले असले तरी पोकळीत सापडल्याची भावना गोंधळून टाकत होती.
दिवस सरत होते आणि आराम चालला होताच शिवाय टीव्हीवर मनसोक्त क्रिकेटची मॅच बघायची हाऊस तर पुरेपूर वसुल होत होती. म्हणता म्हणता सहा महिने कसे उलटले कळलंच नाही.तशी  सहा महिने  मुग्धाने मला हाऊस-मजेत घालवायला स्वतःहून सांगितलं होतं. ती फक्त मधून मधून  टोकायची की तू हे करणार आहेस, ते करणार आहेस वगैरे ते कधी सुरू करणार?
 स्वेच्छानिवृत्तीच्या बाबतीत हमखास विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे "सध्या काय करताय?" खूप जणांनी (माझ्याबरोबरीने  स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या) छोट्या मोठ्या नोकऱ्या पकडलेल्या किंवा व्यवसाय सुरू केलेले असल्याने मी काही करतच नाही  म्हणजे पैसे मिळवण्यासाठी, म्हटल्यावर काहीशा विचित्र नजराना सामोरे जायला लागायचं. शिवाय सध्या नोकरीत असलेले व ज्यांना स्वेच्छा निवृती मिळाली नाही त्यांचे औपरोधक स्वर तर अधिकच बोचरे.

 दिवसाचे जवळजवळ दहा-बारा तास नोकरीत, शिवाय वेगवेगळ्या गावी झालेली बदली, मला घरासाठी काही वेळेच शिल्लक ठेवत नव्हती. स्वजनांचा सहवास  ही कमी तर, घर कामाला हातभार लावणे दूरच. घर कामात सहभाग हवाच असे मला पहिल्यापासूनच वाटत आलय. मुलांच्या बरोबर खेळणे, सुट्टी दिवशी वेळ मिळेल तेव्हा फिरायला नेणे या पलीकडे माझा सहभाग सरकत नव्हता.
घर कामात आपला सहभाग वाढवायचा ही पहिली सुरुवात. त्यामुळे झाड-पूस सारख्या कामाबरोबर वरच्या दर्जाच्या कामाकडे, म्हणजे चहा करणे, कुकर लावणे, भाजी करणे (इथे मला आवर्जून -मुद्दाम सांगायचं आहे की, मी घर काम किंवा कोणतेच काम कमी दर्जाचे, हलक्या दर्जाचे मानत नाही. आपल्याकडे श्रमाला प्रतिष्ठा नाही हा तर एक दुर्दैविलासच) सारख्या कामात बढती करून घेण्याच्या दृष्टीने सुरुवात केली. तशी बाहेरची कामे आम्ही दोघांनी मिळून करायची अस पूर्वीपासून चालू आहे.
घरकामात किती वेळ जातो आणि वेळेचे नियोजन कसे करावे लागते याचा अनुभव आता यायला लागला. मुग्धाला तिच्यातील "क्रिएटिव्हिटी" साठी निवांत वेळेची किती  गरज आहे ते पटायला लागले. तिचं लेखन, पेंटिंग, सामाजिक काम त्यासाठीचा चिंतन, वाचन हे सगळं ती इतके दिवस यात कसं बसत होती या प्रश्नांनं चक्रवायला  झाल.इथ हे कबुल करायला हवं की  हजारो वर्षाच्या संस्काराने असेल कदाचित,पण पुरुषांच्या जीनमध्ये  या बाबतीतची  स्वयंव जाणीव नाहीच. भूक लागली असेल तर काहीतरी खायला तयार करायला पाहिजे हे कळतं, पण पटकन उठून पोहे किंवा उपीट करायचं होत नाही. कुकर लावायचा आहे. अन्न गरम करायला हवं पण ’मॅच’ बघताना पटकन मध्येच उठून हे करायचे लक्षात येत नाही. आपणाला इतक्या गोष्टींची सवय झालेली असते की रात्री पोळ्या कमी असतील तर भाकरी टाकावी अशी अपेक्षा! स्वतः करणार नाही आणि ब्रेड आणायची सूचना करून मोकळे. प्रयत्न चाललाय,पण प्रामाणिकपणे सांगायचं तर अजूनही आपणहून काही करायचे लक्षात येत नाही हे मात्र खरं! हा झाला एक टप्पा .
आम्ही दोघांनीही असं चार चौघासारख आयुष्य घालवायचं नाही हे प्रथम पासूनच ठरवलं आहे. पण म्हणजे कस ? वेगळं म्हणजे नक्की काय याचा शोध घेता घेता, काही प्रयोग केले.( झापडबंद डाम डौलान, उत्सवी,खर्चिक लग्न समारंभाला, आम्ही दोघे गेली 12-13 वर्षे जात नाही हा एक त्यातलाच प्रयोग) काही फसले; काही हाती लागलं याचा हिशोब करायचा नाही. पण आपली भूमिका सोडायचे नाही. मानलेल्या मूल्यांच्या बाबतीत तडजोड करायची नाही हे नक्की. यातून आलेल्या ताण तणावातून एकमेकांच्या साथीनं ही वाटचाल सुखद करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. आता निवांतपणा आहे. वेळ हाताशी आहे. प्रकृती साथ देत आहे, तर काहीतरी केलं पाहिजे. पण स्वतःसाठी काय करायचं आपण लाख ठरवून बसलो हे करायचं वगैरे..
 या साऱ्या कोड्यातून मुग्धांना पहिला सोपा मार्ग काढला. मला योगासनाच्या वर्गात अडकवलं आणि इतके दिवस पेंटिंग करायचे म्हणत होतास तर पेंटींगच्या क्लास मधे नेऊन बसवल.कळत न कळत एक शिस्त यायला लागली.
प्रकृतीच्या कटकटी (गुंतल्यामुळे असेल ) कमी व्हायला लागल्या.
 वाचन हा माझा अत्यंत आवडता छंद. सुट्टी म्हणून वर्तमानपत्रे छापून प्रसिद्ध केले पर्यंत वाचायला आता वेळच वेळ. शिवाय रविवार आवृत्ती आहेतच. ललित्य साहित्याबरोबरच  इतर वेगवेगळी( विषयावरची) पुस्तिके वाचली. ग्रंथायातून आणून ,कधी विकत घेऊन, वाचन चालू आहे.
गंभीर आणि गमतीदार मला दोन्हीची आकर्षण. त्यामुळे हलक्या फुलक्या करमूणकप्रधान नाटका पासून ते अभिजात नाटकेही आवर्जून पाहतो. आशय  फिल्म अर्काइव्हजचा सभासद असल्याने ’अकिराकुरूसोवा, सत्यजित रे, इग्नवार बर्मन. मायकेल अंजलो अंतएनिओ, गिरीश कासारवली अशा प्रतिभावंत दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट  पाहायला मिळाले.
पेंटिंग क्लास मुळे आता मारलेला रेषांना आकार येऊ लागलाय आणि त्यात रंग भरताना मजा यायला लागली आहे. चित्र प्रदर्शनं पाहण चालू आहे. पिकासोची चित्र पाहायला मुद्दाम मुंबईला जाऊन आलो. चित्र कलेवरची पुस्तके विकत घेतो. मिळतील तशी आणतो. त्यांचंही वाचन चालू आहे. समजून घ्यायचा प्रयत्न चालू आहे.
मी ज्या क्षेत्रात काम करत होतो त्यासंबंधीचे अद्यवत ज्ञान ठेवायचा प्रयत्न चालू आहे. मध्यंतरी ’बढती’च्या परीक्षेसाठी दोन पुस्तकांच्या संपादनात सहभाग दिला. आपल्या इतक्या वर्षाच्या अनुभवाचा फायदा होत असेल तर प्रशिक्षणाच्या वर्गावर जाण्याची तयारी आहे.
वाचन पेंटिंग आणि जमलं तर लेखन यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवले आहे एका पुस्तकाचचा इंग्रजीत अनुवाद करतो आहे. एकाचा इंग्रजीतून मराठीत करायचे तयारी चालू आहे.
समविचारी समछंदीचा एक छोटासा समुह गट तयार व्हावा अशी इच्छा आहे. एक छोटा फ्लॅट त्या करता घेतलाय. मनाला येईल तेव्हा वाचा, लिहा, चित्रे काढा, रंगवा, गझल ,गाणी ऐका,-ऐकवा  पडून रहा, नुसते पडून रहा. शवासन करा- इतपतच हं !
माझा मूड आता उमर  खय्यामच्याभाषेत सांगायचं तर,
"Ah,fill the Cup ,What boots it to repeat
How time is slipping underneath our feet
Unborn Tomorrow and Dead Yesterday,
Why Fret about them ? If Today be sweet.
 मला आता कोणी विचारलं "काय चाललंय" मी सांगतो मला वेळच पुरत नाही म्हणजे काय नवीन काम काय घेतलय? जॉब धरलाय की काय ? नाही पण Now I am Reveling.

माझा पुरूष उवाच दिवाळी २००२-२००३-पुरूष स्पंदन मधिल लेख


२०२३ च्या जून महिन्यात पुनर्निर्माणच्या प्रकल्प योजनेत  रिकाम्या ठेवलेल्या फ़्लॅट मधील कपाटाच्या खालच्या ड्रॉवर मधे -जो भिजल्यामूळे घट्ट बसला होता तो सटकन बाहेर आला आणि  आत उलथा पालथ करताना ,जुन्या लेखांच्या कात्रणात हा लेख हाती आला आणि वाचून मोठी मौज वाटली -चला या लेखात  मारलेल्या गप्पा-ठरवलेली कामे-आणि अस बरच कांही -बाही याच आता २१-२२ वर्षनी एकदा सिंहावलोकन कराव -काय काय केल आणि काय केल नाही आणि अजून काय काय करयचं आहे त्याचा लेखा जोखा मांडूयात -करिता सोयीच म्हणून मी ३ टप्पे केलेत -१. २०१० पर्यंत  २.२०११ते २०२० पर्यंत आणि नंतर आता - (करोनाच्या सावटाखाली २/३ वर्षे गेली ) म्हणून हा वेगळा टप्पा. तो पुढील लेखात.---
जयंत लीलावती रघुनाथ
 

Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3