SCULPTURE FRAGMENTED -खंडित शिल्प
खंडित शिल्प
पाश्चिमात्य कलाकारानी आपल संपन्न पुरातन कला वैभव जे कालौघात छिन्न वा खराब वा क्षतीशत झाल आहे अशा कलाकॄतींच्या प्रतिकॄती तयार करून त्यांच सौंदर्य आणि अमुल्यपण जपत नव्या-येणाऱ्या पिढिलाही ते उपलब्द्ध करून दिल.उदा.प्रॅक्सिलाईटची -ऍफ़्रोड्राइट(नीड) वा इतर अशाच शिल्पांच्या पूर्ण प्रतिकृती तयार केल्या.
आपणाकडे अशा प्रकारचे प्रयोग एक अजंठाच्या भित्तिचित्रांच्या प्रतिकृती सोडता खंडित शिल्पांच्या बाबतीत झालेले मला आढळले नाहीत.
दी लुडीव्हीज ऎफ़्रोडाइट-व्हिनस-२०५ से.मि-८१ इंच
रोमन संगमरवरी प्रतिकॄती –कबंध व मांड्य़ा -मूळ शिल्प-इतर मस्तक,ह्स्त ,पाय व वस्त्राचा आधार -या तुट्लेल्य खंडीत भागांचे पुनर्संचयन करून ही प्रतिकॄती केली आहे.
शिल्पी कलाकार -प्रेक्सीटॆलेस -ख्रिस्त पूर्व -४ थे शतक- ग्रीक दर्जेदर कला प्रवाहातील शिल्प
वृक्ष देवता आणि तिची सहचरी-साह्ययक सॅंड स्टोन -२१.१/२ इंच
राजस्थान -वायव्य प्रांत -सिकर-हर्शगिरि-१० वे शतक
सध्या क्लेव्हलॅंड संग्रहालय खाजगी देणगी
बौध्द स्मारकावरील निसर्ग देवतांच्या शिल्पांकनाची स्मरण देणार, मध्य युगीन हिंदू मंदिरांच्या बाह्यांगवरील अस हे शिल्प. सृजनताच तिच्या प्रतिमा रूपातून साकारली आहे.ज्या आम्र वृक्षाशी ती लगटून उभी आहे तो तिच्या स्पर्शाने फ़ळानी बहरला आहे. तिची सखी सहकारी आरश्यात न्याहळते आहे. पृष्ट्भागाच्या चित्रणावरील दिलेला भर, मुलायम शरीरावर रूळणारे कंठ हार आणि दागिने.रेखिव सुंदर चेहरा १०व्या शतकातील शिल्प शैलीचा एक उत्तम नमुना आहे..मंदिराला मदत आणि पाठिंबा व भक्ती यातून पावित्र , मांगल्य आणि समृधी भरभरात याच हे शिल्प जणू प्रतिमांकनच करत की हे प्राप्त होईल.
पाटणा संग्रहातील चामरधारीणी-दिदारगंज यक्षी - मध्य प्र्देश
या शिल्पाच वर्णन करताना डॉ.मनोहर लक्ष्मण वऱ्हाडपांडे आपल्या Woman In Indian Sculpture या पुस्तकात म्हणतात:
’कविश्रेष्ठ कालिदासानी मेघदुतातील यक्षीचे वर्णन-
तन्वी श्यामा शिखरि दशना पक्व बिम्बाधरोष्ठी । मध्ये क्षामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्ननाभि । श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्यां । या तत्रा स्याद्युतिविषये सृष्टिराद्येव धातु: ।
-असे केले आहे.
कालिदासानी या यक्षी -चामर्धारीणीला पहिल होत की काय? अशा या यक्षीची प्रतीकृती करण्याच कोणी मनावर घेइल का?
जयपूर संग्रहातील वृक्षिका देवता -म्हणजे जणू भारतीय शिल्पकारांनी व्हिनसला दिलेल आव्हानच.पण या खंडित शिल्पावरून त्याची पुर्णाकृती शिल्प करण्याच धाडस -आव्हान कोणी स्वीकारलेल दिसत नाही
शेलाटा बांधा,घाटदार,डौलदार शरीराची ही यौवना!
चेहऱ्यावर गुढ स्मित,बाकदार भुवया, गच्च भरलेले घनघोर मादक वक्ष,स्तनद्वयाच्या घळीतून ओघळलेला खोल नाभी भोवती रूळणारा कंठहार, लुभावणारी अंगप्रत्यंगाची गोलाइ ,डौलदार नितंब ,कटी वस्त्रातून दिसणाऱ्या मांसल मुलायम मांड्या, सिंहकटी,-हस्त विरहीत असूनही परिपूर्ण आदर्श स्त्री सौद्रयाच्या साऱ्या -प्रतिमांकनांच्या शिल्पांकनानी बहरलेली ही वृक्षी सुरसुंदरी देवता -सौंदर्याचा अविष्कार या काळाची साक्ष देत समोर येतो.
"मोहिनी" चनकेश्वर मंदिरातील गर्भगृहाच्या समोरील उजव्या बाजुच्या खांबावरील शिल्प-११ वे शतक-बेलुर कर्नाटक.
कानडी तरूणी-मोहिनी -अदाजे ५ फ़ूट उचीचे हे शिल्प म्हणजे -कला शास्त्रातील प्रमाण बद्ध मापांच काटेकोर पालन करून निर्मिलेली कलाकृती. शरीर यष्टी -काळ्य़ा शिळॆतील ही सुदरी -तिच्या मोहिनी या नावाला साजेसी .समुद्र मंथनातून मिळालेल्या अमॄताच देव -दानवातील वाटपाच्या वेळी विष्णूने घेतलेल स्त्रीरूप- मोहीनी.कमनीय बांध्याची,रेखीव धनुष्याकृती भुवया,डॊळॆ आणि सरळ नासिका -जीवणीवर -ओठांवर अस्फ़ूट हास्य.-मस्तकावर उंच मुकुट.आणि मागून दि्सणारा गच्च केश संभार ,भरदार वक्ष आणि सिंहकटी मानेभोवतीच्या अलंकारातील कंठहार स्तन द्वयातून नाभीवर ओघळलेला,मेखलेसह भरगच्च अलंकरण दोन उंचाववलेले कंगण आणि बाजुबद ल्यालेले हात मनगटापासून छिन्न झालेत.बहुधा या दोन हातात उंचावलेली पुषमाला धरली असावी -जी जोत्या पर्यंत दिसते आहे.
यक्षीणी-प्रजनन आणि वनस्पतीची देवता:
यक्षी पूर्व प्रवेशद्वार सांची स्तूप :-बिहार- इ.पू.३ऱ्या शतकात सम्राट अशोकाने उभारलेल्या मूळ स्तुपा सभोवती इ.पू.१ ल्या शतकात सुमारे इ.पू.५०-२५ च्या आसपास बांधलेल्या दगडी भिंतीतील पूर्व प्रवेशद्वारावरील -हत्तीच्या सान्निध्यातील आम्र वृक्षाच्या आधाराने उभी असलेली यक्षीणी. तिच्या सहवासाने तो बहरला आहे.काष्ठ शिल्प व हस्ती दंतावरील शिल्पकारीच्या तंत्राने चितारलेली वालुका पाषाणातील ही यक्षिणी म्हणजे जणू रसरसत्या यौवनाचा उत्सवच.तिने डाव्या हाताने डोक्यावरील डहाळी धरली आहे तर उजवा हात खोडाच्या बेचक्यातून बाहेर काढून दंडाने झाडाचा आधार घेतला आहे.त्रिभंगातील शिल्पात डावा पाय मुडपून तो वृक्षाच्या बुंध्याला टेकला आहे. तर उजवा पाय सरळ पुढे आलेल्या द्वार पट्टीवर ठेवला आहे.पूर्ण अधांतरी आकाशाच्या पार्श्वभूमि वर उभी असलेल्या यक्षीणीच्या शरीराला दिलेला झोक,डावा हात उंचावल्याने उभारलेले तिचे उन्नत उरोज,कलती मान आणि तोल सांभाळणार उंचावलेल भरीव नितंब,खोल नाभी आणि सिंह कटी.शाल भंजिका-वृक्षिका-यक्षी-अप्सरा वा सुरसुंदरी यांच्या शिल्पांकनात क्वचित कांही अपवाद वगळता अलंकारांची -जणू उधळणच असते.केशसंभार पासून ते कटी मेखला सार सार अलंकारानी-दागिन्यानी मढवलेल असत .विशेषत:स्तन द्वयाच्या पोकळीतून नाभिवर रूळणारा कंठहार ही तर खासियतच. येथे मोजकेच दागिने दिसतात.हातभर कंकण ,निमूळत्या पायात गुडघ्यापासून घोट्यापर्यंत पैंजणआणि गळाभर माळा स्तन द्वयावर रूळणारा कंठहारआणि मानेवर रूळणाऱ्या केशसंभारात तुरा असे मोजकच अलंकरण. वस्त्रप्रावरणात उत्तरीय वस्त्र नाही आणि कटीचे वस्त्रही इतके तलम की त्यातून स्त्रीत्वाच्या खूणा दृगोचर होत आहेत..
चकित हरिणी भारतीय संग्रहालय -कोलकत्ता येथिल
विंचवामुळे चकित झालेली यक्ष सुंदरी -५ वे शतक ,अंदाजे मथुरा ,उत्तरप्रदेश,नक्की ठिकाण माहित नाही येथील असावे-रक्त वाळुकापाषाण -२९-१/२ "*१३-१/२ "*१०-१/२ येथे विंचू खालच्या पट्टीवर आहे.
खंडित शिल्प -अचानक विंचू दिसल्या मुळे भयचकित झालेली सुरसुंदरी- मंदिर शिप्लात वारंवार आढळणारा हा आकृतीबंध शिप्लींचा आवडता आहे.विंचू दिसल्यामुळे चकित झालेल्या -भांबावलेल्या-गडबडून गेलेल्या सुंदरीच चित्रण करताना शिल्पींच्या कल्पनाना बहर आलेला दिसतो.विंचू -एक रूपक -इष्काची इंगळी आणि प्रेम विव्हल -खर काम विव्हल अभिसारिकेला मग वस्त्राच भान राहत नाही.कला आणि सहित्यात या कल्पनेचा वापर वारंवार आढळतो.असे यदृच्छादित प्रसंगाद्वारे चकित झालेल्या स्त्रीच्या वस्त्राचे भान सुटल्याचे दाखवून स्त्रीच्या शरिर सौष्ठवाचे सौन्दर्य दृगोचर करणयाचा -स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचा दार्शनिक उत्सव करण्याचा जणू प्रघातच दिसतो.येथे मथुरा शैलीतील ५ शतकातील यक्षी सुंदरीचे खंडित शिल्प आहे.मस्तक, हस्त आणि कबंध विरहित या शिल्पाचा मोहकपणा आणि सौंदर्य लक्ष्य वेधक आहे.
विंचू दिसलयाने तारांबळ उडालेल्या सुंदरीच्या कललेल्या शरिरावरील कमर -पोटाला पडलेल्या वळ्या,स्तन द्वयातून लोंबकळणाऱ्या कंठाहारातील एका बाजुला झुकलेल पदक,विंचू झटक्याण्यचा नादात कमरेवरच निसटत आणि एका बाजुला झालेल वस्त्र यातून सारी हालचाल अत्यंत नजाकतीन शिल्पात साकरणाऱ्या शिल्पीच कौशल्य आणि कसब श्ब्तातीत आहे.अतिशय वळदार धावती रेषा,नितळ मुलायम त्वचा, लयदार शारिर आकृती बंध,झोकदार वस्त्र यातून साधलेली लय एक उत्कृष्ट एकमेवंएका द्वितीयम (खंडित असूनही) परिपूर्ण कलाकृती अस हीच वर्णन करता येइल.
भारतीय शिल्पांकनात शाल भंजिका-वॄक्षिका-यक्षी-अप्सरा -या नंतर मंदिराच्या बाह्यंगावर -भिंतीवर प्रामुख्याने शिल्पांकित्त केल्या गेलेल्या सुरसुंदरीना शिल्प शास्त्राच्या नियमानी बद्ध -(शुक्र निती-चित्र -सूत्र शिल्प शस्त्र इ.) केल्या जाण्या पूर्वी बुद्ध शिल्पांकनातील या यक्षी वा शाल भंजीका मुक्त वाटतात.खर तर नंतरच्या काळातील सुरसुंदरींच्या रेखनांचा वा निर्मितच मूळ हे या बौद्ध शाल भंजीकाच असाव्यात व त्यांतून स्फ़ुर्ती घेऊन किंवा या कल्पनेच्याअभिवृधीतून सुर सुंदरींची निर्मिती केली गेली असावी.आणि नंतर ते शास्त्रात बध केल गेल असाव.
अशा कित्येक सुरसुंदरी -अप्सरा-यक्षी-शाल भंजिका- भारतातील मंदिरात -मंदिराच्या बाह्यांगावर शिल्पिलेल्या आढळतात.दुर्दैवाने -कलौघात त्या भग्न -वा खंडित झाल्या असल्या तरी त्यांच मूळ सौंदर्य त्यातूनही दृगोच्चर होत राहत मळल्या वाटेपासून दूर-दृष्टी आडच्या मंदिरातूनही अशा सौंदर्य-ललनांची शिल्पे दुरलक्षित राहिली आहेत.
हौशी पर्यटन आणि चिकित्सक -संशोधन हेतू पर्यटनाच्या कांही गरजा भागवण्या इतपत प्रसिद्ध मंदिरांच्या आवारात कांही संग्राहालये आहेत उदा.हळेबेळ-बेलुर; -वा वास्तु आवारात मंदिराचे भ्गन अवशेष व्यवस्थित मांडून ठेवले आहेत.पण अशी स्थिती सर्वत्र दिसत नाही.खिद्रापूर (जि.कोल्हापूर)ला अवशॆष असेच नुसते पडलेले आहेत.तर मारकंडा -(जि.गडचिरोलि-)म्हणजे जणू महाराष्ट्रातील खजुराओच.पण इथे इतकी खंडित,भग्न शिल्पे,भिंतीचे तुकदे भाग इतस्तत: पडलेले आहेत. त्याचे कांहींच दस्तैएवजीकरण आढळल नाही.
वर कांही मोजक्याच शिल्पांची महिती उधृत केली आहे.उद्देश हाच की अशा तर्हेचा कांही प्रकल्प हाती घेऊन अशा शिल्पांच्या सुबक पूर्ण प्रतिकृती करून त्याच संग्रहालय केल जाव.या कामी शिल्पकला -शिल्पशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थांचा उप्योग करून घेता येइल.आणि एक सौंद्रयखणी संग्र्हालय उभ राहिल जे आपल्या कलेच्या उच्च वारशाच प्रतिक राहिल. “A THING OF BEAUTY IS JOY FOREVER”
एका शाश्वत आनंदाचा झराच झुळझुळत राहिल.
जयंत लीलावती रघुनाथ
Comments
Post a Comment